पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ‘बेस्ट रेंज अवॉर्ड’ ने गौरव; २०१९ मध्ये सर्वाधिक १८४ कारवाया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 01:44 PM2020-02-19T13:44:05+5:302020-02-19T13:44:23+5:30
लाचखोरीविरोधात तक्रार करण्यात तरुण आघाडीवर
पुणे : लाचखोरांविरोधात आलेल्या प्रत्येक कॉलची दखल घेऊन करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात सर्वाधिक १८४ सापळा कारवाई पुणे विभागात करण्यात आल्या आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला बेस्ट रेंज अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे.लाचखोरांविरोधात तरुणांमध्ये जागृती अधिक होत असून तक्रार देणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने २०१९ मध्ये सर्वाधिक १८४ सापळा कारवाया केल्या. यामध्ये सर्वाधिक कारवाई पोलीस ५१ तर त्याखालोखाल महसूल विभागावर ४२ कारवाया करण्यात आल्या आहेत. १८४ सापळ्यांपैकी एकट्या पुणे जिल्हयात ६५ सापळे रचण्यात आले आहेत. मात्र दोषसिध्दीचे प्रमाण खुपच कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे विभागाने २०१९ मध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी घेताना ही माहिती दिली.
देशातील सर्वात जास्त कारवाई महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कारवाई पुणे विभागात करण्यात आली आहे. नव्या वर्षात २०२० आजपर्यंत एकूण २८ सापळा कारवाई झालेल्या असून त्याची तुलना २०१९ मध्ये आजपर्यंत झालेल्या सापळा कारवाईची तुलना करता त्यामध्ये ४ ने वाढ झाली आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या १८४ सापळा कारवाईमध्ये २६१ आरोपींना पकडण्यात आले. त्यामध्ये वर्ग एकचे ११, वर्ग दोनचे १८, वर्ग तीनचे १५८, वर्ग चारचे १५ आरोपी लोकसेवक व इतर लोकसेवक १३ व खाजगी ४६ व्यक्तींचा समावेश आहे. सापळा कारवाईत झालेल्या सर्व वर्ग एक व दोनच्या आरोपी लोकसेवकांच्या मालमत्तेची उघड चौकशी अनिवार्य करण्यात आली आहे. इतरांच्या बाबतीत गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यात येतो.
़़़़़़
तरुणांमध्ये वाढती जागृती
पुणे विभागाने केलेल्या १८४ सापळा कारवाईत सर्वाधिक तरुणांनी तक्रारी केल्याचे दिसून आले आहे.त्यात २५ वर्षापेक्षा कमी वयाचे १२, २६ ते ३५ वर्षांचे ७५, ३६ ते ४५ वर्षांचे ५८, ४६ ते ६० वर्षांचे ३ १ आणि ६० पेक्षा अधिक वयांचे ८ तक्रारदार होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे केसेसची संख्या वाढत असल्याच ेदिसून येत आहे.
़़़़़़़़़़़
२०१९ मध्ये १०६४ या टोल फ्री कॉलवर एकूण १०९९ कॉल्स प्राप्त झाले होते. त्यापैकी १७ कॉल्सवरुन यशस्वी सापळा कारवाया करण्यात आल्या आहेत.
...........
लाचेबाबत माहिती, तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करु शकता़ तसेच मोबाईल अॅप, ०२० - २६१२२१३४, व्हॉटसअॅप क्रमांक ७८७५३३३३३३ तसेच फेसबुक व मेलवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधू शकता.