पुणे - दरोडा, दुहेरी, तिहेरी खून आणि बलात्कारातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2016 08:37 PM2016-09-02T20:37:30+5:302016-09-02T20:37:30+5:30
जिल्ह्याला हादरवून सोडणा-या जुन्नर तालुक्यातील साकोरी गावातील दुहेरी खून आणि सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
एलसीबीची कारवाई : पिंपरी रेल्वे स्थानकाजवळून सहाजण गजाआड
पुणे, दि. 2 - जिल्ह्याला हादरवून सोडणा-या जुन्नर तालुक्यातील साकोरी गावातील दुहेरी खून आणि सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. या आरोपींकडून ठाण्यातील हिल लाईन भागातील दरोड्यासह आणखी एक तिहेरी खून उघडकीस आणण्यात एलसीबीला यश आले असून ही कारवाई पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी दिली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली होती.
ऋषी उर्फ ऋषन अशोक काळे (वय 19, रा. कासारवाडी रेल्वे स्टेशन, कासारवाडी. मुळ रा. रांजणगाव मश्जिद, ता. पारनेर, जि. अहमनगर), अनिल उर्फ ति-या ढोम्या काळे (वय 30, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ. मुळ रा. मुखई जातेगाव, शिक्रापुर, ता. शिरूर), मथ्या उर्फ नामदेव यमराज भोसले (वय 19, रा. जाधववाडी, चिखली. मुळ रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर), नागेश उर्फ सचिन अशोक काळे (वय 32, रा. रांजणगाव मशिदीजवळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर), आकाश उर्फ डोळा कळसिंग भोसले (वय 20, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन, आकुर्डी. मुळ रा. पिंपळगावपिसा, खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि गोविंद उर्फ निलेश सुरेश भोसले (वय 20, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी साकोरीमधील शंकर भिमाजी पानसरे (वय 45) यांच्या घरात 26 सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला होता. कु-हाडीने घाव घालुन शंकर यांचा खून केल्यानंतर त्यांची पत्नी संगिता (वय 40) यांच्यावर सामुहिक बलात्कार करुन त्यांचाही खून केला होता. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरीक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली होती. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असल्यामुळे तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळण्यात याव्यात यासाठी गावकरी आक्रमक झाले होते.
अधीक्षक डॉ. जाधव यांच्या सुचनांनुसार जुन्नर उपविभागातील 3 आणि एलसीबीची 3 अशी एकुण 6 पथके आरोपींचा मागावर होती. पोलीस सराईत गुन्हेगार, तात्पुरत्या वस्त्या करुन राहणारे लोक यांच्याकडे चौकशी करीत होते. अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांचीही माहिती घेण्यात येत होती. अशा टोळ्यांमधील कोणी आरोपी कारागृहात सुटले आहेत काय याचीही खातरजमा करण्यात आली.
वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांना ठाणे शहरातील हिल लाईन परिसरात अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळताच त्यांना दोन्ही गुन्ह्यातील साधर्म्य लक्षात आले. आरोपींनी 23 जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील करवले यथील शंकर नामदेव भंडारी (वय 60) यांच्या घरावर दरोडा टाकत भंडारी यांच्यासह त्यांची पत्नी फसुबाई (वय 50) आणि त्यांचा मुलगा शनि (वय 20) यांचा डोक्यात कु-हाडीचे घाव घालुन खून केला होता. घटनेच्या दिवशीचे सर्व मोबाईल डिटेल्स पोलिसांनी संकलीत केले. त्यासोबतच साकोरी मधील घटनेच्या दिवशीचे त्याभागातील मोबाईल डिटेल्स काढण्यात आले. दोन्ही ठिकाणी घटना घडताना एकच मोबाईल क्रमांक वापरला गेल्याचे समोर येताच या टोळीबद्दल संशय गडद झाला.
एलसीबीच्या पोलीस या टोळीच्या मागावर असताना काही सराईत पिंपरी रेल्वे स्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती निरीक्षक जाधव यांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक राम जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश रामाघरे, उपनिरीक्षक अंकुश माने, कर्मचारी दत्तात्रय गिरमकर, सुनिल बांदल, मुन्ना मुत्तनवार, सचिन गायकवाड, महेश गायकवाड, विशाल साळुंखे, शफी शिलेदार, सतिश कुदळे, अतुल डेरे, गणेश महाडिक, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, सचिन मोरे, विघ्नहर गाडे आणि चंद्रकांत वाघ यांच्या पथकाने सापळा रचुन आरोपींना अटक केली. पुढील तपासासाठी आरोपींना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दरोडा, दुहेरी खून आणि सामुहिक बलात्काराचा गंभीर गुन्हा 3 दिवसात उघडकीस आणुन 6 आरोपींना गजाआड केल्याने अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. डॉ. जाधव यांनी पथकास 25 हजार रूपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.