पुणे जिल्ह्यात पुराचा हाहाकार, २० बळी; खान्देश, नाशिकलाही अतिवृष्टीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:00 AM2019-09-27T04:00:12+5:302019-09-27T06:42:55+5:30
राज्यात २७ जण मृत्युमुखी; पुण्यात ३ जण वाहून गेले; खान्देशात वीज पडून आठ ठार
पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शहरातील ओढे आणि पुरंदर, बारामतीमधून वाहणाऱ्या कºहा नदीने रौद्ररूप धारण केल्याने २० जणांचा बळी गेला, तर ३ जण वाहून गेले असून, ते अद्याप बेपत्ता आहेत. तसेच पुरात ९०० पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडली. पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेलेल्या हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे. झोपडपट्ट्यांबरोबरच आलिशान सोसायट्या व बंगल्यांतही पुराचे पाणी घुसल्याने नागरिक भयभीत झाले होते. जिल्ह्यातील पाच तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला.
बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवातझाली. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याने आंबिल ओढ्याला मोठा पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतीपर्यंत संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढले. सुमारे आठ ते दहा फूट पाणी वाहत होते. पुरामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने पाण्याच्या लोंढ्यात शेकडो वाहने वाहून गेली.
अरण्येश्वर येथील टांगा कॉलनीतील घराची भिंत पडून चार जणांचा मृत्यू झाला. पुण्यापासून २० किलोमीटरवर असलेल्या खेडशिवापुरला बुधवारी झालेल्या अतिवृष्टीने चौघांचे प्राण गेले. आणखी तिघे वाहून गेले आहेत. खेडशिवापूर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारतही वाहून गेली.
वानवडी येथील भैरोबा नाल्याच्या पुरात कारमधून जाणारे दोघे वाहून गेले. कात्रजला कार वाहून गेल्याने त्यातील तिघे बेपत्ता झाले आहेत. तेथेच एका महिला आणि मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला.
पुरंदर तालुक्यात भिवडीतील ओढ्याच्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची ५ पथके कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
साडेतीन तासांत ७९ मिमी
पुण्यात बुधवारी रात्री साडेआठ ते बारा वाजेपर्यंत ७९ मिमी पाऊस झाला़ त्यामुळे कात्रज, नºहे, धनकवडी, पद्मावती, सहकारनगर, धायरी, वारजे हा परिसर जलमय झाला़
खान्देशात विजांचे थैमान
जळगाव/धुळे : खान्देशात गुरुवारी दिवसभर पाऊस व विजांनी थैमान घातले. धरणगाव तालुक्यातील भवरखेडे-विवरे परिसरात एकाच कुटुंबातील चार व अन्य एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे वीज पडून दोन मुली व भडगाव तालुक्यातील वलवाडी शिवारातील गुराख्याचा मृत्यू झाला.
जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले
औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडल्याने जालना व बीड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात पैनगंगेची पातळी वाढल्याने मराठवाडा-विदर्भ संपर्क तुटला आहे. जालना जिल्ह्यात पूर्णा नदीला आलेल्या पुरात वाहून जाणाºयास वाचविताना दोघे वाहून गेले.
नाशिकमध्ये पाच जणांचा मृत्यू
नाशिक : दोन दिवसांत झालेल्या पावसाने जिल्ह्यात पाच जणांचा बळी घेतला. इगतपुरी तालुक्यात गुरुवारी ढगफुटीप्रमाणे पडलेल्या पावसामुळे अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाने द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भीमा नदीत दुधाचा टँकर पडून दोघे बेपत्ता
पंढरपूर : येथील नवीन पुलावरुन गुरुवारी सकाळी दुधाचा टँकर कठडा तोडून भीमा नदीत पडला़ दुर्घटनेत चालकासह अन्य एक जण बेपत्ता झाला.