पुणे: रिक्षातून आईला धक्का देऊन पळवली दहा दिवसाची चिमुकली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 04:07 PM2017-08-16T16:07:53+5:302017-08-16T18:54:33+5:30
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बोपोडी येथे भरदिवसा रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे, दि. 16 - पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बोपोडी येथे भरदिवसा रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.
आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रेश्मा शेख (वय 20 रा. दापोडी) बोपोडीतील खासगी रूग्णालयातून एका शेअर रिक्षात बसून दापोडीकडे घरी परत येत असताना त्या रिक्षात आगोदर बसलेल्या अनोळखी महिलेने रेश्मा शेखला धक्का मारून रिक्षाबाहेर ढकलून दिले. तिचे दहा दिवसांचे बाळ रिक्षावाल्याच्या मदतीने पळवून नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा शेख या बोपोडीतील एका खासगी रुग्णालयात रिक्षातून दहा दिवसांच्या मुलीला घेऊन गेल्या. मुलीला रूग्णालयात घेऊन गेल्यानंतर परत येत असताना, शेख शेअर रिक्षामध्ये बसल्या. त्या रिक्षात आगोदरपासूनच एक महिला प्रवास करत होती. त्या रिक्षात बसल्यावर काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी उतरायचे होते ते ठिकाण येताच रिक्षावाल्याला पैसे द्यावयाचे असल्याने त्यांनी आपले बाळ जवळ बसलेल्या महिलेकडे दिले. त्यानंतर आरोपी महिलेने शेख यांना जोराचा धक्का दिला, शेख रिक्षातून खाली पडल्या. तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. बाळाला घेऊन ती महिला रिक्षातून पळून गेली. हॅरिस पुलाखालील रस्त्याने रिक्षा निघून गेली. शेख यांनी खडकी पोलिसांकडे या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे.
बाळाच्या अपहरणात रिक्षावाल्याचाही हात -
बाळाला घेऊन रेश्मा शेख ज्या शेअर रिक्षात बसल्या. त्या रिक्षात आगोदरच बसलेल्या महिलेने शेख यांना धक्का मारून ढकलून दिले. त्याचवेळी रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. बाळाला घेऊन रिक्षा बोपोडी येथील पुलाखालून निघून गेली. रिक्षावाला आणि बाळ पळवून नेणारी महिला यांचे संगनमत असून त्यांनी नियोजनबद्ध कट रचून बाळ पळविले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.