पुण्याचे पाणी पेटले!
By admin | Published: May 4, 2016 03:10 AM2016-05-04T03:10:39+5:302016-05-04T03:10:39+5:30
पुण्याच्या हक्काचे पाणी दौंड-इंदापूर तालुक्यासाठी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्णयावरून मंगळवारी पुण्यात अक्षरश: रणकंदन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी
पुणे : पुण्याच्या हक्काचे पाणी दौंड-इंदापूर तालुक्यासाठी सोडण्याच्या पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्णयावरून मंगळवारी पुण्यात अक्षरश: रणकंदन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवनात तोडफोड केली. महापालिकेच्या मुख्य सभेतही यावरून रणकंदन झाले. महापौरांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध केला. शिवसेनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
कालवा समितीच्या बैठकीला पुण्यातील एका आमदाराला न बोलाविता आणि महापालिकेला विश्वासात न घेता दौंडसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री बापट यांनी सोमवारी घेतला. त्याची पहिली प्रतिक्रिया मनसेकडून आली. सकाळी अकराच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते घोषणा देत सिंचन भवनात शिरले़ त्यांनी अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्या कार्यालयात शिरुन तेथील टेबलखुर्च्यांची मोडतोड केली़ काचा फोडल्या़ ‘आधी सोडलेल्या पाण्याचा हिशोब द्या, मगच पाण्याला हात लावा’, ग्रामीण भागाला पाणी देण्याला विरोध नाही़ हुकुमशाही पद्धतीला आहे़, अशी पत्रके त्यांनी वाटली.
महापालिकेच्या मुख्य सभेतही याचे पडसाद उमटले. बापट यांच्या निर्णयाचा महापालिकेच्या मुख्यसभेत तीव्र निषेध करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सभा तहकुब केली. महापौर प्रशांत जगताप यांनी सर्व नगरसेवकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पुण्याचे पाणी पळवून देऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
१५ जूनपर्यंत पाऊस झाला नाही तर पाणीबाणी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ५.१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. ३१ जुलैपर्यंत ३.३ टीएमसी पाणी लागणार आहे. ०.७५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा अंदाज आहे. ०.३३ टीएमसी पाणी पाटबंधारे विभागास तर अमानोरा व नांदेड सिटीसाठी ०.२ टीएमसी पाणी लागणार आहे. जुलैअखेरपर्यंत एकूण ५.३५ टीएमसी पाणी लागणार आहे. प्रत्यक्षात ५.१ टीएमसी इतकेच पाणी धरणात आहे.
शिवसेनाही आक्रमक
या निर्णयाला शिवसेनेही विरोध केला आहे. शहराध्यक्ष विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्यास विरोध केला. पुणेकरांनी थेंब-थेंब बचत करून साठविलेले पाणी बापट यांच्या बालहट्टासाठी दौंड, इंदापूरला कोणत्याही परिस्थितीत सोडून देणार नाही. हा निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा बुधवारी बापट यांच्या घरावर पुणेकर हंडा मोर्चा काढतील, असा इशाराही निम्हण यांनी दिला.