मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : या एका गोष्टीमुळे जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 19:09 IST2018-10-06T19:04:38+5:302018-10-06T19:09:59+5:30
या अपघातामागील कारणे शोधणे सुरु असताना असे कारण समोर आले की ज्यामुळे अपघात नाही पण जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती.

मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : या एका गोष्टीमुळे जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती....
पुणे :कालवा फुटून झालेल्या हानीतून पुणेकर सावरत नाहीत तोच शहरात होर्डिंग कोसळून भीषण अपघात घडला आहे. या अपघातामागील कारणे शोधणे सुरु असताना असे कारण समोर आले की ज्यामुळे अपघात नाही पण जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पुण्यातील मंगळवार पेठ भागात होर्डिंगचा सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात चार व्यक्तींचा बळी गेला असून सुमारे दहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत. हा अपघात गंभीर तर आहेच पण यंत्रणांच्या दुर्लक्षाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकीकडे रेल्वे, खासगी ठेकेदार आणि महापालिकेचे एकमेकांकडे बोट दाखवणे सुरु असताना नागरिकांनीसुद्धा साधा 'झेब्रा क्रॉस'वर उभे न राहण्याचा नियम पाळला असता तर जीवितहानी कमी झाली असती असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
अधिक विस्ताराने सांगायचे झाल्यास, पुण्यातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून जागेवर दोन व्यक्ती तर उपचारांच्या दरम्यान दोन व्यक्तींचे निधन झाले. अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या घटनेमागे हलगर्जीपणे होर्डिंग कापणाऱ्यांची चूक आहेच. मात्र सिग्नल सुटल्यावर घाईघाईत पुढे जाण्यासाठी काही गाड्या झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्या आहेत. दुर्दैवाने होर्डिंग झेब्रा क्रोसिंगच्या अधिक जवळ असणाऱ्या गाड्यांवर पडले आणि अपघात घडला. त्यामुळे कदाचित झेब्रा क्रोसिंगच्या मागे गाड्या उभ्या असत्या तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती. त्यामुळे अशाप्रकारे निष्काळजी होर्डिंग न लावण्याचा आणि लावू देण्याचा धडा प्रशासनाने घेण्याची गरज आहेच. मात्र नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज असल्याचे पुन्हा समोर आले आहे.