"आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणं आवश्यक", प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 08:35 PM2024-07-25T20:35:13+5:302024-07-25T20:36:42+5:30
Prakash Ambedkar News: एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पुणे - आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणे गरजेचे आहे. आपण कोणत्याही पक्षात असाल, तर तिथे ओबीसींना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत आपण १०० चा आकडा गाठत नाही, आणि हा आकडा आपण गाठत नसू तर ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
एसटी व ओबीसी या समाजासाठी सध्या महाराष्ट्रात जी आरक्षणासाठी अराजकता माजली आहे यासंदर्भात आरक्षण बचाव यात्रा गुरूवारी ४ वाजता समताभूमी , फुले वाडा, गंज पेठ आली. यावेळी आरक्षण बचाव संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आंबेडकर बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणाहून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे.
ही यात्रा गुरुवारी पुण्यात आली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य ज्येष्ठ नेते वसंतस साळवे, उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग, अविनाश भोसिकर, पुणे शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, विद्यार्थी आघाडीचे नागेश भोसले, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि भाजप हे ब्राह्मण आणि कायस्थ यांचे प्रतिनिधी आहेत.जरांगे पाटील यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी कायदेशीर नाही, असे कोणी म्हणत नाही. तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवू नका. ही मंडळी फसवणूक करणारी असल्याची टीका ॲड. आंबेडकरांनी प्रस्थापित नेत्यांवर केली.