पुण्यात कमी वजनाची सर्वाधिक बालके, सव्वादोन लाख बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:43 AM2019-05-11T06:43:31+5:302019-05-11T06:43:36+5:30

गेल्या वर्षभरात राज्यात जन्मलेल्या नवजात बालकांपैकी सर्वाधिक कमी वजनाची बालके पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

In Pune, the maximum number of children weighing less than two and a half kg | पुण्यात कमी वजनाची सर्वाधिक बालके, सव्वादोन लाख बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी

पुण्यात कमी वजनाची सर्वाधिक बालके, सव्वादोन लाख बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी

Next

- स्नेहा मोरे
मुंबई  - गेल्या वर्षभरात राज्यात जन्मलेल्या नवजात बालकांपैकी सर्वाधिक कमी वजनाची बालके पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य माहिती यंत्रणेकडील माहितीनुसार राज्यातील २ लाख १० हजार ४६३ नवजात बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. या अहवालाच्या माध्यमातून गेल्या वर्षाच्या तुलनेत जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१७-१८ साली राज्यात हे प्रमाण २ लाख ५ हजार ५८२ एवढे होते.

सकस पोषण आहाराचा अभाव आणि विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे लहान मुलांमध्ये वजन कमी होण्याचे तसेच त्यांची वाढ खुंटण्याचे प्रमाणही वाढते आहे. या अहवालानुसार, पुण्यात गेल्या वर्षी जन्मलेल्या २१ हजार ४७३ नवजात बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी असल्याचे उघड झाले आहे. पुण्यानंतर राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण अधिक आहे.
मातेचे गर्भावस्थेमध्ये योग्य प्रमाणात पोषण होणे गरजेचे असते. ते न झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या पोषण आहाराच्या योजना जाहीर करत असले तरीही त्याचा लाभ या मुलांना मिळतो की नाही, हा प्रश्न या अहवालातील निरीक्षणातून उपस्थित झाला आहे.

याविषयी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सागर शाह यांनी सांगितले की, कमी वजनाचे बाळ, मुदतीपूर्व प्रसूती, श्वसनाचा संसर्ग, कावीळ, जन्मजात विकृती, न रडलेले बाळ अशा नवजात बालकांना वेळीच उपचारांची गरज असते. प्रसूतीनंतरही बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी योग्य पालनपोषण होणे गरजेचे आहे, नाहीतर हीच बालके भविष्यात कुपोषणाच्या श्रेणीमध्ये परावर्तित होण्याची शक्यता बळावते.

गरोदरपणात काळजी गरजेची
जन्मत:च बालकाचे वजन कमी असू नये यासाठी मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तक्षयासंबंधीच्या तपासणीबरोबरच मातेने बालकाचे वजन बरोबर वाढते आहे का हे पाहण्यासाठी नियमित तपासण्या करून घ्याव्यात. रक्तक्षय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लोह व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या सुरू करणे, प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह अशा घटकांनी युक्त असा पुरेसा आहार घेणे, बाळंतपणासाठी दवाखान्यात वेळेवर नोंदणी करणेही गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांत बाळंतपणासंबंधीच्या सर्व तपासण्या व उपचार मोफत उपलब्ध आहेत.
- डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोगतज्ज्ञ, विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय

Web Title: In Pune, the maximum number of children weighing less than two and a half kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.