पुणे मेट्रोला ब्रेक लागणार
By admin | Published: January 3, 2017 04:50 AM2017-01-03T04:50:56+5:302017-01-03T04:50:56+5:30
पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधीकरणाने वनाझ ते रामवाडी या मार्गावरील नदीपात्रातील प्रस्तावित बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली
पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधीकरणाने वनाझ ते रामवाडी या मार्गावरील नदीपात्रातील प्रस्तावित बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली. यामुळे मेट्रोच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र नदीपात्रातील बांधकाम वगळता मेट्रो प्रकल्पाची इतर कामे करण्यास कोणताही अटकाव केलेला नाही. या याचिकेची पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाझ ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट या दोन मार्गांवरून मेट्रो धावणार आहे. वनाझ ते रामवाडी हा मार्ग १४ किमी लांबीचा आहे, त्यापैकी केवळ डेक्कन ते डेंगळे पुलापर्यंतच्या १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून जात आहे. मेट्रो मार्ग नदीपात्रातून नेला जाऊ नये यासाठी खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर, आरती किर्लोस्कर यांनी हरित न्यायाधीकरणापुढे याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती यू. डी. साळवी व डॉ. अजय देशपांडे यांनी सोमवारीच्या सुनावणीत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही बांधकाम करण्यास अंतरिम स्थगिती दिली. तसेच मेट्रोची उभारणी करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनला या खटल्यात प्रतिवादी करून घेण्याचेही निर्देश हरित न्यायाधीकरणाने दिले आहेत.
मेट्रोचा पहिला आराखडा तयार करण्यात आला होता, तेव्हा ती जंगली महाराज रस्त्यावरून जाईल असे दर्शविण्यात आले होते, मात्र यास विरोध झाल्याने त्यामध्ये बदल करून मेट्रो नदीपात्रातून नेण्यात आली. मात्र नदीपात्रात बांधकाम झाल्याने पर्यावरणाची हानी होणार असल्याचे स्पष्ट करीत पर्यावरणवाद्यांनी हरित न्यायाधीकरणापुढे याचिका दाखल केली. अॅड. असीम सरोदे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली.
सध्याची स्थगिती हंगामी असली तरी आता या याचिकेच्या निकालावर वनाझ ते रामवाडी या मार्गाचे भवितव्य अवलंबून आहे. जर न्यायाधीकरणाने नदीपात्रातून मेट्रो नेण्यास मनाईचा निर्णय दिला तर संपूर्ण आराखड्यात बदल करावा लागेल. (प्रतिनिधी)