घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे निघाले ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला राहणार हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:49 PM2022-04-12T16:49:21+5:302022-04-12T16:49:38+5:30
भविष्यात राज ठाकरे महाराष्ट्राला उंचीवर घेऊन जाणार आहेत. राज ठाकरेंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे असं वसंत मोरेंनी सांगितले.
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांच्या ठाण्यातील उत्तरसभेची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. या सभेला राज्यातून अनेक नेते ठाण्यात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्याबाबत वावड्या उठवल्या जात होत्या. सोमवारी मोरे यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर वसंत मोरे यांच्या मनसे सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. ठाण्याच्या सभेला ये, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना सांगितले होते. त्यानुसार मोरे ठाण्यात सभेला उपस्थित राहून भाषणही करणार आहेत.
याबाबत वसंत मोरे(Vasant More) म्हणाले की, माझ्या पाठीवर राजसाहेबांचा कायम हात आहे. माझं साहेबांवर खूप विश्वास आहे. ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंनी भाषण करण्याची संधी दिली आहे. अनेक गोष्टी मनात साठवून ठेवल्या आहेत. त्या मी बोलून दाखवेन. मागील १५ वर्षापासून पक्षीय राजकारणात मनसे वाढवण्यासाठी मी सक्रीय आहे. पक्ष बांधणीसाठी माझी सुरुवात झालीय. पुणे महापालिकेत २०-२५ नगरसेवक मनसेचे निवडून आणणारच आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विषयाशी माझी तुलना होऊ शकत नाही. राज ठाकरे अतिशय संवेदनशील आहेत. नेतृत्व खंबीर आहे म्हणून मी डळमळीत झालो नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच भविष्यात राज ठाकरे महाराष्ट्राला उंचीवर घेऊन जाणार आहेत. राज ठाकरेंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. मतांमध्येही ते परिवर्तित होत आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या शेवटच्या माणसांपर्यंत विकासाचे मुद्दे पोहचवले पाहिजे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून मला माझ्या प्रभागात विकासाच्या मुद्द्यावर लोकं निवडून देत आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. जर हे काम झाले मनसे ही महाराष्ट्रातील तरूणांची सर्वात मोठी संघटना असेल असा विश्वास नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान ९ तारखेला ठाण्याला सभा होती तेव्हा मी जाणार होतो. पण ही सभा रद्द होऊन ती १२ तारखेला घेण्यात आली. १२ ला मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे. मात्र साहेबांनी सोमवारी सभेला ये असं सांगितले. मग आधी लग्न कोंढाण्याचं, घरचा कार्यक्रम घरचे करतील. मी कुटुंबात लहान आहे. दोन भाऊ मोठे आहेत. ते लग्नाच्या समारंभाचा कार्यक्रम करतील. मी ठाण्याच्या सभेसाठी पुण्याहून निघालो आहे असं वसंत मोरे यांनी मुंबई तकला मुलाखतीत सांगितले आहे.