...तर पुणे-मुंबई प्रवास होणार २० मिनिटांत! हायपर लूप कंपनीसोबत सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:42 AM2017-11-17T02:42:24+5:302017-11-17T02:43:56+5:30
पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.
पुणे : पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्राथमिक स्तरावरील हा करार असला तरी ही योजना पूर्ण झाल्यास पुण्यातून मुंबईला अवघ्या २० मिनीटात पोहोचणे शक्य होणार आहे.
हायपर लूप हा वाहतुकीचा नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्टो-चुंबकीय प्रणोदकांमधून वाहतूक केली जाते. या प्रणालीद्वारे एका तासात १ हजार ८० कि. मी. वेगानेही प्रवास करता येतो. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक प्रणाली आहे. पीएमआरडीएने केलेल्या सामंजस्य करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गांचे पूर्व व्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलीटी स्टडी)अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टीम कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तपासणी करुन अहवाल तयार करण्यासाठी हा करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्यकार्यकारी अधिकारी किरण गित्ते, हायपर लूप टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष निक अर्ले, यावेळी उपस्थित होते.
सध्या हायपर लूप आधारित ट्रांजिट प्रोजेक्टस नेदरलँडमध्ये, अबू धाबी ते दुबई आणि स्टॉकहोम ते हेलसिंकी येथे चालू आहे. भारतात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यात करार झाले आहेत. विजयवाडा आणि अमरावती या शहरांसाठी पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे.
हायपर लूप तंत्रज्ञानाने मुंबई आणि पुणे विभागातील महानगर प्रदेशांना जोडल्यास प्रवास वेळ २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत होईल. तसेच त्याचा २ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येला फायदा होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री