पुणे महापालिकेचा बाँड गुंतवणुकीसाठी खुला

By admin | Published: June 23, 2017 02:14 AM2017-06-23T02:14:33+5:302017-06-23T02:14:33+5:30

‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे

Pune Municipal Bond open for investment | पुणे महापालिकेचा बाँड गुंतवणुकीसाठी खुला

पुणे महापालिकेचा बाँड गुंतवणुकीसाठी खुला

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे. त्याचा पाया पुणे महापालिकेने रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा मला विश्वास वाटतो, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काढले.
मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या हस्ते बेल वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड (२२६४ कोटी रु.) गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. विकासासाठी बॉण्ड विक्रीस काढणारी पुणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरली असून या बॉण्डच्या माध्यमातून जो निधी उभारला जाईल त्याद्वारे स्मार्ट पुणे शहर निर्माण होईल. पुणेकरांना २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत पुणे शहरामध्ये घनकचऱ्याच्या विलगीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रत्येक थेंबावर प्रक्रिया केली जाईल. मेट्रो आणि सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. पुणेकरांना २४ तास पाणी पुरवठा केला जाईल. जलवाहिन्यांसोबत फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे पुणे देशातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नायडू म्हणाले की, आज शेअर बाजारात घंटी वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. या घंटीतून निघालेला नागरी सुधारणेचा प्रतिध्वनी देशभर घुमण्यास मदत होणार आहे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा. केंद्र व राज्य सरकार विकासासाठी शहरांना निधी देतेच पण शहरांनी स्वत:चे स्रोत निर्माण करायला हवेत. केंद्रीय वित्त राज्यमंत्री मेघवाल यांनी २०१७ हे वित्तीय सुधारणांचे वर्ष म्हणून ओळखले जाईल, असे सांगितले. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे
देशातील पहिल्या क्रमाकांचे शहर बनविण्याची हमी दिली. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रास्ताविकात विकासकामांचा आढावा घेतला.

Web Title: Pune Municipal Bond open for investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.