पुणे मनपामध्ये ११ गावांचा समावेश; राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:35 AM2017-07-20T02:35:00+5:302017-07-20T02:35:00+5:30
फुरसुंगी व उरळी या दोन गावांबरोबरच नऊ गावांचा अंशत: डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फुरसुंगी व उरळी या दोन गावांबरोबरच नऊ गावांचा अंशत: डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने एका पत्राद्वारे उच्च न्यायालयाला बुधवारी दिली.
पुणे भोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती.
बुधवारच्या सुनावणीत सरकारी वकील मनीष पबाळे यांनी न्यायालयात सरकारचे एक पत्र सादर केले. महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड उरळी व फुरसुंगी येथे आहे. या दोन गावांचा आणि यापूर्वी महापालिकेत अंशत: समाविष्ट असलेल्या तथापि काही अंशी महापालिकेत समाविष्ट नसलेल्या नऊ गावांचा डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पूर्णत: महापालिकेत समावेश करण्यात येईल. त्यासंदर्भात डिसेंबर २०१७ अखेरीस अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.
तसेच उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात येईल, त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल, असेही राज्य सरकारने पत्रात म्हटले आहे.
पाण्याची उपलब्धता, पाणी योजना, कचऱ्याचे नियोजन, रिंगरोड इत्यादी बाबींचा विचार करून या गावांचा पुणे मनपात समावेश करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले. सरकारच्या या निर्णयानंतर न्यायालयाने या याचिका निकाली काढल्या.
सरकारच्या या निर्णयामुळे उर्वरित २३ गावांना आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.