पुणे मनपामध्ये शहरालगतच्या उरळी आणि फुरसुंगीचाच समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:48 PM2017-07-19T15:48:39+5:302017-07-19T15:48:39+5:30
पुणे महापालिकेच्या हद्दीत 34 गावांच्या समावेशाबाबत आज राज्य सरकारने मुंबई हायकोर्टापुढे प्रतिज्ञा पत्र सादर केले.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19 - पुणे महापालिकेच्या हद्दीत 34 गावांच्या समावेशाबाबत आज राज्य सरकारने मुंबई हायकोर्टापुढे प्रतिज्ञा पत्र सादर केले. यामध्ये राज्य सरकारने केवळ उरळी आणि फुरसुंगी देवाची या दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षात टप्याटप्याने 34 गावांचा शहराच्या हद्दीत समावेश करण्यात येणार असून पहिल्या टप्यात 9 गावांचा अशंत: समावेश तर फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पूर्ण अशा 11 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे.
पुण्या भोवतालच्या 34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर म्हणणं मांडताना राज्य सरकारने केवळ दोन गावांचा समेवश करण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे. तर नऊ गावांचा अंशतः समावेश केला जाईल असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
गावांच्या समावेशासाठी हवेली नागरिक कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 12 जून रोजी झालेल्या सुनावणीत या गावांबाबत तीन आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानुसार आज राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.
मात्र, पहिल्या टप्यात 11 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. कारण पालिकेत सर्व गावांचा समावेश झाल्यास, संबंधित भागांतील पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन वर्षात टप्याटप्यात गावचा समावेश करण्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार पहिल्या टप्यात 9 गावांचा अशंत: समावेश करण्यात येणार आहे. तर उरुळी देवाची आणि फुरसूंगी ही गावे पूर्णपणे समाविष्ट करण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. तर उर्वरित 23 गावे पुढील 3 वर्षात टप्याटप्याने समाविष्ट करण्यात येणार आहे.
या अकरा गावांचा होणार पहिल्या टप्प्यात समावेश-
उरुळी देवाची , फुरसुंगी बावधन बुद्रुक, लोहगाव (उर्वरित), हडपसर (साडेसतरानळी), मुंढवा (उर्वरित केशवनगर), शिवणे (उर्वरित), धायरी (उर्वरित), उंड्री, आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक.