पुणे-नाशिक कॉरिडॉरला 1546 हेक्टरची गरज, एमएसआरडीसीतर्फे पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 09:44 AM2024-09-02T09:44:48+5:302024-09-02T09:45:16+5:30

Pune-Nashik Corridor : पुणे ते नाशिक पट्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. या महामार्गासाठी १,५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. 

Pune-Nashik corridor needs 1546 hectares, environmental clearance process started by MSRDC | पुणे-नाशिक कॉरिडॉरला 1546 हेक्टरची गरज, एमएसआरडीसीतर्फे पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू

पुणे-नाशिक कॉरिडॉरला 1546 हेक्टरची गरज, एमएसआरडीसीतर्फे पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू

 मुंबई - पुणे ते नाशिक पट्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. या महामार्गासाठी १,५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. 

पुणे आणि नाशिकदरम्यान १८९.६ किमीच्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करणार आहे. त्यासाठी १७ हजार ५३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतून हा कॉरिडॉर जाणार आहे. या महामार्गाचा पुणे ते शिर्डी असा १३४ किलोमीटरचा, तर शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज असा ६० किमीचा मार्ग हा चेन्नई-सुरत महामार्गाचा भाग असेल. त्यापुढे चेन्नई-सुरत महामार्ग ते नाशिक असा निफाड राज्य महामार्गाचा १८ किलोमीटरचा रस्ता असेल. 

या महामार्गावर ३७ किमीचे जोडरस्तेही होणार आहेत. त्यामध्ये भोसरी येथे ३.६७ किमीचा, रांजणगाव येथे २३.६३ किमीचा, शिर्डी येथे ८.७९ किमी, एनएच ६०ला भागवत मळा येथे ०.९१ किमी जोडरस्ता प्रस्तावित आहे. महामार्गाच्या उभारणीनंतर पुणे, नाशिक आणि मुंबई हा औद्योगिक त्रिकोण जवळ येणार आहे. तसेच पुणे-नाशिक प्रवास  पाच तासांवरून दोन ते अडीच तासावर येणार आहे. 

महामार्गावर ११ बोगदे 
या महामार्गासाठी १५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील १४२९.७१ हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे, तर ५३.६४ हेक्टर जमीन सरकारी आहे. तसेच ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमिनीचे आहे. यातील मुख्य मार्ग ५४ गावांमधून जाणार असून, कनेक्टर २९ गावांतून जाईल. या मार्गावर ११ बोगदे प्रस्तावित आहेत. तसेच ७ मुख्य पूल आणि ६० वायडक्टही प्रस्तावित आहेत.  

    पुणे-नाशिक प्रवास अडीच तासांवर.
    राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहराजवळून जाणार.
    महामार्गालगत मोठे कारखाने, उद्योग, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्र विकसित करण्याचा उद्देश.
    पुणे-नाशिक प्रवास ५ तासांवरून २ ते अडीच तासांवर येणार.

Web Title: Pune-Nashik corridor needs 1546 hectares, environmental clearance process started by MSRDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.