पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा प्रश्न लागणार मार्गी ?
By admin | Published: March 30, 2017 12:12 AM2017-03-30T00:12:45+5:302017-03-30T00:12:45+5:30
पुणे-नाशिक रेल्वेचा खूप दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे.
वाकी : पुणे-नाशिक रेल्वेचा खूप दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे. याच रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तो पुणे- नाशिक महामार्ग क्र. ५०च्या पश्चिम बाजूने होणार असून हा रेल्वेमार्ग पुणे-नाशिक महामार्गाला समांतर होणार आहे. अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी दिली.
खेड तालुक्यात विमानतळ न झालेल्या स्थानिक लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत होती. शुक्रवारी (दि. २४) सुरू झालेल्या या सर्वेक्षणामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. संबंधित रेल्वेचा मार्ग तळेगावहून थेट चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातून ५ महत्त्वाची स्थानके असणार आहेत.
महाराष्ट्रातील विद्येच माहेरघर असणारा पुणे जिल्हा, नगर जिल्हा, तसेच नाशिक जिल्हा या ३ जिल्ह्यांच्या विकासाला भरभराटी येणार आहे. चाकण व इतर औद्योगिक परिसरातील कामगार, ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्थात विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. तालुक्यातील बराचसा भाग हा डोंगराळ असल्याने डोंगरी भागाचा विकास होईल तसेच संबंधित रेल्वेमार्ग झाल्याने तालुक्यातील तरुण सुशिक्षित वर्ग तसेच इतर सर्वच वर्गांतील जनतेला रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन संबंधित विभागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन लोकांना दळणवळणाला फायदा होईल. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लावून त्याचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी आशा व्यक्त होत आहे.
२०९ : संबंधित रेल्वेमार्ग हा २०९ किलोमीटर अंतराचा असणार आहे. पाच वर्षांपूर्वी या मागार्ला मंजुरी मिळाली होती.
१,८९३ : तेव्हाचे अंदाजपत्रक सुमारे १,८९३ कोटी रुपयांचे होते.
२,४२५ : मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
यांनी २,४२५ कोटी रुपये मंजुरी दिली होती.
२६५ : आधीच्या सर्वेक्षणामुळे हा मार्ग एकूण २६५ किलोमीटर इतका होता.
५६ : नव्याने केलेल्या या सर्वेक्षणात सुमारे ५६ किलोमीटर अंतरात कपात झाली आहे.
आधीचा व आत्ताचा रेल्वे सर्वेक्षण मार्ग
आधीचा मार्ग : पुणे- देहूरोड- तळेगाव- चाकण- राजगुरूनगर- पाबळ- निरगुडसर- मंचर- नारायणगाव- आळेफाटा- संगमनेर- सिन्नर- नाशिक.
आताचा सुरू केलेला सर्वेक्षण मार्ग
पुणे- देहूरोड- तळेगाव- चाकण एमआयडीसी- वाकी- राजगुरूनगर- पेठ- मंचर- नारायणगाव- आळेफाटा- संगमनेर- सिन्नर- नाशिक असा आहे.
हा महामार्ग पुणे-नाशिक महामार्ग क्र.५० च्या पश्चिम बाजूने असेल.