पुण्यात विज्ञानाची किमया; मृत्यूआधी घेतलं होतं तरुणाचं वीर्य, दोन वर्षांनी जुळ्यांचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:12 AM2018-02-15T10:12:17+5:302018-02-15T12:25:36+5:30
पुण्यामध्ये एका 27 वर्षीय तरूणाच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर त्याच्या वीर्यापासून जुळ्या मुला-मुलीचा जन्म झाला आहे.
पुणे- पुण्यामध्ये एका 27 वर्षीय तरूणाच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर त्याच्या वीर्यापासून जुळ्या मुला-मुलीचा जन्म झाला आहे. मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांनी मुलाचं वीर्य मेडिकल सेंटरमध्ये गोठवून ठेवलं होतं. त्या वीर्यापासून दोन बाळांचा जन्म झाला आहे. दोन वर्षाआधी या तरूणाचा मृत्यू ब्रेन ट्यूमरने झाला होता. मुलाला ब्रेन ट्यूमर होण्याआधी त्याच्या आई-वडिलांनी मुलाचं वीर्य मेडिकल सेंटरमध्ये गोठवलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
डॉक्टरांनी मुलाचं वीर्य व एका महिला डोनरच्या अंडाणुचं मिलन करून भ्रुण तयार केलं. यानंतर डॉक्टरांनी भ्रुणाचं सरोगेट आईच्या गर्भात प्रत्यारोपण केलं. भ्रुण प्रत्यारोपण केलेली महिला मृत्यू झालेल्या तरूणाची नातेवाईक आहे. या महिलेने दोन दिवसांसाठी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दरम्यान, विशेषज्ञांनी या संपूर्ण प्रक्रियेवर नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत.
2013मध्ये जर्मनीत शिक्षण घेत असताना पुण्यातील 27 वर्षीय तरूणाला ब्रेन ट्यूमर असल्याचं निष्पन्न झालं. केमो थिअरपीमुळे मुलाची प्रजनन क्षमता कमी होईल, अशी शक्यता त्यावेळी डॉक्टरांनी वर्तविली होती. म्हणून केमो थिअरपी सुरू करण्याच्या आधी डॉक्टरांनी तरूणाचं वीर्य सुरक्षित ठेवलं. त्यानंतर 2016मध्ये मुलाचा मृत्यू झाला. तरूणाच्या आईने म्हंटलं की, माझा मुलगा नेहमी सगळ्यांशी मिळूनमिसळून राहायचा. केमोच्या कठीण प्रक्रियेलाही तो सामोरं गेला. त्याचदरम्यान त्याचे डोळे गेले. पण तरिही त्याचं आयुष्यावर असलेलं प्रेम कमी झालं नाही. आजारी असूनही तो तरूण सगळ्यांना कहाण्या व गंमतीशीर किस्से सांगून खूश करायचा. मुलाच्या स्वभावासारखीच नातवंडं मिळावी, असा विचार तेव्हा मुलाच्या आईच्या मनात आला.
त्यानंतर त्या तरूणाच्या आईने जर्मनीतून मुलाचं वीर्य मागवलं व पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधील आयवीएफ प्रक्रियेसाठी संपर्क केला. मुलाच्या वीर्यासाठी डॉक्टरांनी महिला डोनरचा शोध घेतला. तसंच नंतर सरोगेट मदरचाही शोध घेतला. सुरूवातीला मुलाची आईच मुलाटं वीर्य गर्भात धारण करायला तयार होती, पण मेडिकली फिट नसल्याचं डॉक्टरांनी महिलेला सांगितलं. त्यानंतर मृत्यू झालेल्या तरूणाची एक नातेवाईक यासाठी तयार झाली. संपूर्ण मेडिकल तपासणीनंतर महिलेच्या गर्भात भ्रुण प्रत्यारोपित करण्यात आल्याचं सरोगसी तज्ज्ञ सुप्रिया पुराणिक यांनी सांगितलं. दरम्यान या प्रक्रियेवर चेन्नईतील इंडियन सरोगसी लॉ सेंटरचे संस्थापक हरी जी राम सुब्रमनियम यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तरूणाच्या वीर्याचा वापर मुलांना जन्म देण्यासाठी करा? यासाठी तरूणाची परवानगी घेतली होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.