विसर्जनाचा ‘पुणे पॅटर्न’ फेल
By admin | Published: September 9, 2016 02:48 AM2016-09-09T02:48:42+5:302016-09-09T02:48:42+5:30
जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकरिता अमोनियम बायकार्बाेनेटच्या मदतीने पुणे पॅटर्न अर्थात घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या पालिकेच्या
मीरा रोड : जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकरिता अमोनियम बायकार्बाेनेटच्या मदतीने पुणे पॅटर्न अर्थात घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या पालिकेच्या आयत्यावेळच्या आवाहनास भाविकांचा तुरळक प्रतिसाद मिळाला. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी सहा प्रभाग समिती कार्यालयांतून ५५ किलो अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले. मात्र, किती भाविकांनी ते नेले आणि या पद्धतीने विसर्जन केले, याची नेमकी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही.
विशेष म्हणजे एकट्या प्रभाग समिती-१मधून ५० किलो बायकार्बाेनेट देण्यात आले. मुळात पर्यावरणपूरक सण साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यासह पालिकेने कृत्रिम तलावांनाही बगल दिल्याने पालिकेचे एकंदर पर्यावरणप्रेम दिखाऊ असल्याची टीका होत आहे.
उत्सवासाठी गणेशमूर्ती सर्रास प्लास्टर आॅफ पॅरिसच्या बनवल्या जातात. त्यासाठी वापरला जाणारा रंगही घातक रसायनांचा असल्याने तलाव, नदी, खाडी, समुद्रात विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. जलप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या सरकारच्या सूचनांना पालिकेने आधीच केराची टोपली दाखवली. कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळत असताना त्यालाही तिलांजली दिली.
गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी महापालिकेने पुणे पॅटर्नप्रमाणे घरच्या घरी गणेश विसर्जन करण्याचे आवाहन महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील व आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी महापालिकेच्या वतीने नागरिकांना केले. घरी विसर्जन करण्यासाठी पाण्यात मिसळण्यासाठी लागणारे अमोनियम बायकार्बोनेट पालिकेने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात भाविकांसाठी उपलब्ध करून दिले.
अशा उपक्रमासाठी जनजागृती करणे आवश्यक होते. आयत्यावेळी असे आवाहन करून काहीही साध्य होत नाही. कारण, भाविक आधीच मूर्तीची नोंदणी करतात. छोटी मूर्ती आणून घरीच बादलीत विसर्जन करण्याचे आवाहन करायचे म्हणजे वरातीमागून घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असला तरी अशा उपक्रमांसाठी नगरसेवकांना सहभागी करून घेणे आवश्यक होते. मात्र, पालिका प्रशासनाने नगरसेवकांना डावलल्याने शिवसेना नगरसेवक जयंतीलाल पाटील यांनी आयुक्तांकडे थेट लेखी तक्रारच केली होती. (प्रतिनिधी)