पुणे-पिंपरीची मेट्रो निविदेच्या मार्गावर
By admin | Published: February 28, 2017 01:56 AM2017-02-28T01:56:40+5:302017-02-28T01:56:40+5:30
महापालिका निवडणुकीत भरभरून मते दिलेल्या पुणेकरांचे मेट्रो चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे
पिंपरी : महापालिका निवडणुकीत भरभरून मते दिलेल्या पुणेकरांचे मेट्रो चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. एकूण मेट्रो मार्गापैकी ५० टक्के मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पुर्ण करून महामेट्रो या कंपनीने पिंपरी- चिंचवड ते रेंजहिल्स या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या निविदाही काढल्या आहेत. रेंजहिल्सपासून पुढे हा मार्ग थेट स्वारगेटपर्यंत आहे. त्याही कामाच्या निविदा काढण्याची तयारी प्रशासकीय तयारी सुरू आहे.
भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुणे मेट्रो चे भूमीपूजन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केले. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर बरेच महिने काहीच होत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीकडून होत असलेल्या टीकेला धार चढली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत पुणेकरांनी भाजपाला भरघोस मतांनी निवडून दिले. आता केंद्र, राज्य व महापालिका अशा तिन्ही ठिकाणी भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे पुणेकरांच्या अपेक्षा वाढल्या असून त्या पुर्ण करण्यासाठी भाजपाने मेट्रोचे पहिले पाऊल टाकले आहे.
राज्यातील नागपूर व पुणे येथील मेट्रो च्या कामासाठी महामेट्रो ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीला पुण्याच्या कामात गती आणण्याच्या सुचना केंद्र व राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार काम सुर झाले असून पहिल्या १० किलोमीटर मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. याच मार्गाच्या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
रेंजहिल्स पर्यंतच्या या मार्गावर अन्य मार्गाच्या तुलनेच वाहतूक व अन्य अडचणी कमी आहेत. त्यामुळेच या मार्गाची निवड करण्यात आली आहे. एक महिना मुदतीची ही निविदा आहे. त्यानंतर प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करून दोन ते तीन महिन्यात या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.
रेंजहिल्सच्या पुढचा स्वारगेट पर्यंतचा मेट्रो चा मार्ग संपुर्ण भुयारी आहे. त्यासाठी भूसंपादन, वाहतूक नियोजन व अन्य बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत.
निविदा जाहीर करण्यापासून ते प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत व नंतर ते पुर्ण होईपर्यंतही त्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या सोप्या असलेल्या मार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारनेच तशी सुचना कंपनीला केली असल्याची माहिती मिळाली. नागपूर मेट्रो चे काम बरेच पुढे गेले आहे. पुण्याचे कामही तसेच गतीने करावे असे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>अडचण झाली दूर...
मेट्रो च्या नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गाला काही स्वयंसेवी संस्था संघटनांनी हरकत घेतली होती. ते प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात आहे. आता बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत बदल केल्यामुळे ती अडचण दूर झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नदीपात्राचेही सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती मिंळाली.एक महिना मुदतीची ही निविदा आहे. त्यानंतर प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करून दोन ते तीन महिन्यात या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.