अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:57 PM2022-08-22T20:57:38+5:302022-08-22T20:58:33+5:30
कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला असं मनसेचे किशोर शिंदेंनी म्हटलं.
मुंबई - राज्यात सरकार बदलल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेत. हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे असं सातत्याने सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुण्यातील मनसेचे किशोर शिंदे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. गणेशोत्सवात अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
किशोर शिंदे म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला. गेल्या २० वर्षापासून संगम तरूण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रसंगावर चलचित्र देखावा आयोजित करतो. जेणेकरून लहान मुलांना इतिहास समजावा. यंदा अफझल खानाचा वध दाखवायचा होता. खानाने देऊळं तोडली. शेर शिवराज सिनेमात हे सगळं दाखवलं आहे. अफझल खान देवमाणूस आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच हिंदुत्ववादी विचारांनी हे सरकार आले आहे. त्यामुळे सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. गणेशोत्सवात अफझल खानाचा वध दाखवण्यास कसला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आहे. मनसे आमदार राजू पाटील हेदेखील गृहमंत्र्यांशी बोलणार आहेत. उद्या याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत अशीही माहिती मनसे नेते किशोर शिंदे यांनी दिली.
दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगून पोलीस चालढकल करत आहेत. सांगलीत कधीकाळी दंगल घडली होती. महाराजांचा इतिहास लपवता येणार नाही. महाराजांचा इतिहास आम्ही दाखवणार आहोत. १०० टक्के लोकांना इतिहास दाखवणार आहोत. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही चालतील असंही मनसेचे किशोर शिंदे यांनी सांगितले आहे.
मनसेचा हिंदुत्ववादी बाणा
मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्ववादी विचारांचा आवाज बुलंद करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा मुद्दा पुढे आणला. पोलिसांनी अनधिकृत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असं राज यांनी म्हटलं. त्यानंतर भाजपानेही राज ठाकरेंच्या मागणीला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे सरकार हिंदुत्वविरोधी आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्यात बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी विचार पुढे नेणार असं म्हटलं होतं. त्यामुळे आता मनसेने केलेल्या आरोपावर सरकार आणि गृहमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचे आहे.