पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं; पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:06 PM2024-06-28T14:06:02+5:302024-06-28T14:07:58+5:30
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले, कार अपघात आणि ड्रग्स प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुणे कार अपघात प्रकरण विरोधकांकडून उचलून घेण्यात आले. या प्रकरणात कुठल्या मंत्र्यांने पोलिसांना फोन केला, आरोपीला वाचवण्यासाठी कुणी दबाव टाकला अशा प्रकारचे प्रश्न विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला विचारले. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर थेट उत्तर दिले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पुणे कार अपघात हा गंभीर विषय, ज्या डॉक्टरांना अटक करण्यात आली त्यांनी तपासात म्हटलं मला माझं तोंड उघडावं लागेल. त्यांचे तोंड उघडण्यासाठी नार्को टेस्ट करावी. परंतु या प्रकरणी पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तांना कुणाकुणाचे फोन गेले होते हे अनुत्तरीत आहे. महाराष्ट्राला सत्याची अपेक्षा आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला नको असं भाजपा नेहमी म्हणते. मग कुठल्या मंत्र्याने पोलीस आयुक्तांना फोन केला याची माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
त्यावर पोलीस आयुक्त किंवा पोलीस स्टेशनला या प्रकरणी कुठल्याही मंत्र्यांनी फोन केला नाही. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिथले स्थानिक आमदार पोलीस स्टेशनला गेले होते. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत मी अग्रवाल यांच्या कंपनीत कामाला होतो, त्यांनी फोन केला म्हणून गेल्याचं आमदारांनी म्हटलंय. १५ मिनिटे त्यांनी पोलिसांकडून सगळी माहिती घेतली त्यानंतर ते निघून गेले. या व्यतिरिक्त कुणीही या प्रकरणात दबाव आणला नाही. कुणीही पोलिसांना फोन केल्याचा रेकॉर्ड नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी आव्हाडांना सभागृहात दिले.
दरम्यान, महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही. पुण्याचा उडता पंजाब होतंय, ड्रग्समाफियांनी थैमान घातलंय. ज्या पुण्याची शैक्षणिक हब म्हणून ओळख झाली. तिथे बाहेरची मुले शिकण्यासाठी येतात तिथे पालकांना चिंता लागली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडते. एक कार विना नंबरची सहा महिने फिरतेय. पोलिसांना सापडली कशी नाही? नंबरशिवाय गाडी चालवता येत नाही. आरोपीला जामीन मिळाला. कारवाईला विलंब होण्यास राजकीय कारण आहे हे स्पष्ट आहे. २ तरुणांचे जीव जातात. रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत हिंमत जाते हे कुणाच्या सांगण्यावरून असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.