" पुणे महापालिकेचा राज्यात डंका; कोरोना संकटातही पुणेकरांनी भरला सर्वाधिक मिळकतकर"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:07 AM2020-09-16T11:07:14+5:302020-09-16T11:44:16+5:30
पुणे महापालिका गेल्या महिन्यात सर्वाधिक मिळकत कर जमा करणारी महापालिका ठरली आहे..
लक्ष्मण मोरे-
पुणे : कोरोनाच्या आर्थिक अडचणीच्या काळातही पुणेकरांनी प्रामाणिकपणे आपला मिळकत कर भरला असून राज्यातील २६ महापालिकांमध्ये पुणे महापालिका अव्वल ठरली आहे. ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुणेकरांनी गेल्या सहा महिन्यात तब्बल ८०० कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या तुलनेत हा आकडा ६०० कोटींनी अधिक आहे. मुंबई-ठाणे-नवी मुंबई-नागपुर-नाशिक महापालिकांना पुणेकरांनी मागे टाकले आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवड महापालिका आहे.
कोरोनामुळे शासकीय यंत्रणांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ऐन मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नव्या आर्थिक वर्षाला फटका बसला. याला राज्यातील महापालिका अपवाद ठरल्या नाहीत. राज्यामधील २६ महापालिकांचे यंदाचे उत्पन्न पाहिले असता मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसते आहे. मिळकत कर हाच महापालिकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. कोरोनाच्या साथीमुळे नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी आपले कर अद्याप भरलेले नाहीत.
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपुर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद आदी महापालिकांच्या मिळकतकराचा आकडा पाहता पुणे सर्वाधिक कर भरणारे शहर ठरले आहे.
सांगली-कुपवाड, मालेगाव, भिवंडी, चंद्रपूर या महापालिकांना तर एक कोटींचे उत्पन्नही गाठता आलेले नाही. तर, नातूर आणि नांदेड पालिका पाच कोटींच्या आतच उत्पन्न मिळवू शकल्या आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर या महापालिका कशाबशा दहा ते वीस कोटींच्या दरम्यान तगल्या आहेत. तर, जळगाव, परभणी, उल्हासनगर आणि अकोला या महापालिकांचे आॅगस्टअखेरीस असलेले मिळकत कराचे उत्पन्न शून्य आहे.
====
पुणे महापालिकेकडे आतापर्यंत ८०० कोटीचा मिळकत कर जमा झाला आहे. यंदा बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्नाचे मार्ग मर्यादित झाले आहेत. या परिस्थितीतही पुणेकरांनी मात्र पालिका प्रशासनाचा गाडा हाकण्याकरिता साथ देत आपला कर भरला आहे. अन्यथा पालिकेची आर्थिक स्थिती अवघड झाली असती. प्रशासनाकडून येत्या 1 आॅक्टोबरपासून अभय योजना आणण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास दीड हजार कोटींचे उत्पन्न मिळकत करामधून मिळण्याची अपेक्षा आहे.
====
पुणेकरांनी कर भरण्याकरिता सर्वाधित ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. लॉकडाऊनच्या काळातही पुणेकरांनी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करत आपला मिळकत कर वेळेत भरला आहे. यासोबतच पालिकेचे सेवा केंद्र आणि मुख्य इमारतीमधील नागरिक सहाय्यता कक्षामध्येही नागरिकांनी आपला कर जमा केला आहे. मे आणि जुन या काळात सर्वाधिक म्हणजे ६०० कोटींचा कर जमा झाला आहे.
====
पुणेकरांनी कोरोनाच्या काळातही गेल्या पाच महिन्यात तब्बल ८०० कोटींचा कर जमा केला आहे. यामध्ये सर्वाधिक कर ऑनलाईन पद्धतीने जमा झाला आहे. पुणे महापालिका गेल्या महिन्यात सर्वाधिक मिळकत कर जमा करणारी महापालिका ठरली आहे. अद्यापही कर भरणा सुरु असून आगामी काळात हे उत्पन्न आणखी वाढेल.
- विलास कानडे, प्रमुख, कर आकारणी व कर संकलन विभाग, पुणे महापालिका
=====
मिळकत करांची महापलिकेनुसार आकडेवारी (आकडे कोटीत)
महापालिका उत्पन्न (ऑगस्ट अखेर)
मुंबई २१२
पुणे ७९९.४८
पिंपरी-चिंचवड ३६९
ठाणे १३२.१६
कल्याण-डोंबिवली १०८.९४
नवी मुंबई ७२.८४
नागपुर ७१.६४
वसई-विरार ५१.४१
नाशिक ३९.४३
कोल्हापुर ३६.९८
सोलापूर २१.६१
औरंगाबाद १४.३३
अहमदनगर १०.११
लातूर ४.१३
नांदेड ३.२३
अमरावती १.३७
धुळे १.२२
सांगली-कुपवाड १.१९
मालेगाव ०.६३
भिवंडी ०.५४
चंद्रपुर ०.२५
जळगाव ०.००
परभणी ०.००
उल्हासनगर ०.००
अकोला ०.००