सैनिकाचे प्राण वाचविण्यासाठी थबकले पुणे...
By admin | Published: July 29, 2015 12:50 AM2015-07-29T00:50:54+5:302015-07-29T00:50:54+5:30
तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकाने जिगर दाखवित ‘ब्रेनडेड’ आईच्या यकृत आणि मूत्रपिंडाचे दान केले. पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावत रस्त्यावरची वाहतूक काही वेळासाठी थांबविली
पुणे : तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकाने जिगर दाखवित ‘ब्रेनडेड’ आईच्या यकृत आणि मूत्रपिंडाचे दान केले. पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावत रस्त्यावरची वाहतूक काही वेळासाठी थांबविली. विमानतळापर्यंतचा १३ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ८ मिनिटांत पूर्ण केला. वायुसेनेने विशेष विमान उपलब्ध करून दिल्याने यकृत अवघ्या सव्वा तासात दिल्लीत पोहोचले आणि त्याने एका सैनिकाचे प्राण वाचले. यकृत आणि किडनीची गरज असलेल्या पुण्यातील दोघांसाठीही अशीच सर्व यंत्रणा हलली. त्यांच्यावरही वेळेत उपचार झाले.
ललिता सरवदे या जिगरबाज सिग्नलमॅन गणेश यांच्या आई. १८ जुलैला एका अपघातानंतर त्यांना पुण्यातील लष्कराच्या कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारास प्रतिसाद मिळेना. २६ जुलैला डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ घोषित केले.
आईच्या आठवणी चिरंतन राहाव्यात यासाठी गणेश यांनी आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. याच वेळी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात किडनी आणि यकृताची गरज असल्याचे कमांड
रुग्णालयात कळविण्यात आले
होते. त्यामुळे ललिता सरवदे
यांचे मूत्रपिंड आणि यकृत
दिल्लीला पाठविण्याचे ठरले.
मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याअंतर्गत कायदेशीर बाबी पूर्ण करणे आवश्यक होते. वानवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर पोलिसांनीही तातडीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या.
प्रश्न होता प्रवासाचा. ठराविक कालावधीत अवयवांचे प्रत्यारोपण होणे गरजेचे होते. पुण्याच्या वाहतुकीतून विमानतळापर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक होते. यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी पुढाकार घेतला. रुग्णवाहिकेसाठी रस्त्यावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ निर्माण केला. कमांड रुग्णालयापासून लोहगाव विमानतळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली. रुग्णवाहिका विनाथांबा अवघ्या ८ मिनिटांमध्ये विमानतळावर पोहोचली. येथे भारतीय वायुसेनेचे विशेष विमान सज्ज होते. विमानाने लगेचच उड्डाण भरले आणि १ तास २० मिनिटांमध्ये दिल्लीला पोहोचले. तेथील लष्करी रुग्णालयात मृत्यूशय्येवर पडलेल्या एका माजी सैनिकावर यकृत आणि सैनिकाच्या मुलावर मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्याबरोबर सरवदे यांच्या आणखी एका मूत्रपिंडाचे पूना रुग्णालयातील एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. डोळे नेत्रपेढीमध्ये देण्यात आले.
अवयवांच्या प्रवासाठी पुण्यात बनला ग्रीन कॉरिडॉर
पुण्याच्या गजबजलेल्या वाहतुकीतून अवयव वेळेत विमानतळावर पोहोचावेत म्हणून वाहतूक पोलिसांकडून ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनविण्यात आला होता. कमांड रुग्णालयापासून लोहगाव विमानतळापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे अवयव नेणाऱ्या रुग्णवाहिकेने कोठेही न थांबता अवघ्या ८ मिनिटांमध्ये प्रवास पूर्ण केला होता. वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आवाड, सहायक पोलीस निरीक्षक अनिता हिवारकर यांनी हा ‘ग्रीन कॉरिडॉर’ उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
पहिल्यांदाच ‘मल्टिपल’ अवयवदान
लष्कराच्या कमांड रुग्णालयातून पहिल्यांदाच एका ‘ब्रेनडेड’ व्यक्तीच्या विविध अवयवांचे दान करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या ‘मल्टिपल’ अवयवदानातून दिल्लीतील रुग्णांवरही प्रत्यारोपण करणे शक्य झाले.
चार जणांना मिळाले जीवदान
ललिता सरवदे यांच्या अवयवदानामुळे मृत्यूशय्येवर पडलेल्या तीन जणांना जीवदान मिळाले आहे.
अवयव पुण्याहून दिल्लीला पाठविण्यासाठी शहरातील प्रवास पूर्ण करण्यासाठी रस्ते रिकामे असणे गरजेचे होते. त्यासाठी लष्कराच्या कमांड रुग्णालयाने आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आम्ही अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णालयाअगोदर एक एस्कॉर्ट मोबाईल व्हॅन दिली. या व्हॅनने विमानतळाकडे जाणारे रस्ते रिकामे केले. त्यामुळे अर्धा तासाचा हा प्रवास अवघ्या ८ मिनिटांमध्ये पूर्ण झाला. पुण्यात पहिल्यांदाच ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला.
- सारंग आवाड,
उपायुक्त, वाहतूक पोलिस विभाग
विमानतळापर्यंतचा १३ किलोमीटरचा प्रवास पार केला अवघ्या ८ मिनिटांत
येथे भारतीय वायुसेनेचे विशेष विमान सज्ज होते. विमानाने लगेचच उड्डाण भरले आणि १ तास २० मिनिटांमध्ये दिल्लीला पोहोचले. तेथील लष्करी रुग्णालयात मृत्यूशय्येवर पडलेल्या एका माजी सैनिकावर यकृत आणि सैनिकाच्या मुलावर मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. ठराविक कालावधीत अवयवांचे प्रत्यारोपण होणे गरजेचे होते.