पुणे-सोलापूर मार्गाच्या कामांची चौकशी
By Admin | Published: July 21, 2016 04:33 AM2016-07-21T04:33:54+5:302016-07-21T04:33:54+5:30
निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल
मुंबई : पुणे-सोलापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिले.
या महामार्गाच्या कामातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात आणि नव्याने कुठल्या सुविधा देता येतील या बाबत संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक आपण अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत घेऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. हा रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला असल्याचा व कामे निकृष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला. मूळ आराखड्यानुसार या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, अनेक कामे व्हायची असून नव्याने काही गोष्टी करणे आवश्यक असल्याचे अजित पवार, राहुल कुल, जयंत पाटील, राणा जगजितसिंह यांनी सांगितले. कंत्राटदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच, कामे अपूर्ण असूनही टोल का आकारला जात आहे असा सवालदेखील केला. पन्नास वर्ष टिकणे अपेक्षित असलेला रस्ता जर फक्त तीन वर्षांत खराब होत असेल, तर दोषी कंत्राटदारावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर कंत्राटदाराची चौकशी आणि कारवाईचे आश्वासन देत त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
।भविष्यात कोणत्याही रस्त्याचे काम शंभर टक्के पुर्ण झाल्याशिवाय टोल वसुली केली जाणार नाही, अशी तरतूद टोल विषयक धोरणात करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.