पुण्यात युवासेना शहराध्यक्षावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
By admin | Published: November 6, 2014 03:31 AM2014-11-06T03:31:29+5:302014-11-06T03:31:29+5:30
शिवसेनेच्या युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष नितीन भुजबळ यांच्यावर अज्ञात दोन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वडगावशेरी येथे ही घटना घडली
पुणे : शिवसेनेच्या युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष नितीन भुजबळ यांच्यावर अज्ञात दोन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वडगावशेरी येथे ही घटना घडली. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ राजकीय वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप नितीन भुजबळ यांनी केला आहे़
नितीन गोविंंद भुजबळ (३२) हे बुधवारी सकाळी सनसिटीतून विमान नगरमधील कार्यालयाकडे चालकासमवेत कारमधून निघाले होते. ते वृंदावन सोसायटीजवळ आले असता एका हल्लेखोराने मोबाइलवर बोलण्याचा दिखावा करीत त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावली. हॉर्न वाजवूनही तो रस्त्याच्या बाजूला झाला नाही. त्यामुळे नितीन कारमधून उतरून त्याच्याशी बोलू लागले. त्याचवेळी अचानक दुसऱ्या व्यक्तीने पाठीमागून येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात नितीन जखमी होऊन चालकाशेजारील सीटवर कोसळले. प्रसंगावधान राखत चालकाने कार पुढे काढली. नितीन हे जखमी अवस्थेतच शास्त्रीनगरमधील येरवडा पोलीस ठाण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी त्यांना तात्काळ पोलिसांसमवेत खासगी रुणालयात रवाना केले. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)