पुणे - गुंडा स्क्वॉडकडून सराईत सोनसाखळी चोरटा जेरबंद
By Admin | Published: September 3, 2016 08:33 PM2016-09-03T20:33:55+5:302016-09-03T20:33:55+5:30
कर्नाटक पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या तसेच सोनसाखळी चोरीच्या तब्बल 86 गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने (दक्षिण विभाग) जेरबंद केले आ
>- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - कर्नाटक पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेल्या तसेच सोनसाखळी चोरीच्या तब्बल 86 गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने (दक्षिण विभाग) जेरबंद केले आहे. पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने हल्ला केला होता. यामध्ये दोन पोलिसांसह चौघे जखमी झाले होते. आरोपीकडून आणखी 12 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले असून 9 लाख 16 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
अली मंझुर जाफरी उर्फ इराणी उर्फ अली अक्रम जाफरी उर्फ इराणी (वय 30, सध्या रा. दहावा मैल, वडकीनाला) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार युसुफ समीर इराणी यालाही अटक करण्यात आली आहे. अक्रम इराणी हा कर्नाटकमधील संजयनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना धक्काबुक्की करुन निसटला होता. युसुफ याच्यासह एका चाळीमध्ये तो वेषांतर करुन रहात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी मिळाली होती. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह आयुक्त सुनिल रामानंद, अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे आणि उपायुक्त पी. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली.
रामानंद यांनी तात्काळ अतिरीक्त पोलीस मदतीला दिले. सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चाळीला घेरले. पोलीस आल्याचे समजताच अक्रमने घरातील लाईट बंद केल्या. सिमेंटचा पत्रा उचकटून तो भिंतीवरुन उडीमारुन पळून जात असतानाच निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्रसिंग चौहान, हवालदार राजनारायण देशमुख, भालचंद्र बोरकर, सुनिल चिखले, इकबाल शेख, रमेश चौधर, प्रविण तापकीर, गणेश साळुंके, संजय बरकडे, विवेक जाधव, विठ्ठल बंडगर, प्रविण पडवळ, नितीन रावळ,राकेश खुणवे आणि चालक गंगावणे यांनी त्याला जेरबंद केले. यावेळी झालेल्या झटापटीत हवालदार राजनारायण देशमुख, गणेश साळुंके आणि इतर दोन नागरिक जखमी झाले.
सोनसाखळी चोरी करताना आरोपी अक्रम सीसीटीव्हीमध्ये अथवा अन्य कोणत्याही प्रकारे ओळख पटू नये म्हणून हेल्मेट किंवा मास्कचा वापर करीत होता. त्याने विविध शहरांमध्ये असे गुन्हे केले असून सर्वाधिक गुन्हे पुण्यात केलेले आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे उपायुक्त पी.आर. पाटील आणि सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांनी सांगितले. त्याच्याकडे केलेल्या तपासात शहरात यापुर्वी केलेल्या गुन्ह्यांव्यतिरीक्त आणखी नविन दहा गुन्हे आणि दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. पोलिसांनी एकूण 255 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज असा एकुण 9 लाख 16 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केला. तो पुणे शहरातील 58 आणि कर्नाटक व ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 28 अशा एकुण 86 गुन्हयात फरार आहे.