पुण्यातील शिक्षकाचा प्रताप, पुत्रप्राप्तीसाठी 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करून केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 10:56 AM2018-04-24T10:56:42+5:302018-04-24T10:56:42+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाला सांगवी पोलिसांनी सोमवारी अटक केली.
पुणे- जिल्हा परिषदेच्या शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाला सांगवी पोलिसांनी सोमवारी अटक केली. मार्च महिन्यात एका 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याच्या आरोपात या शिक्षेकाला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
या शिक्षकाचं पहिलं लग्न झालं असून त्याला एक 14 वर्षीय मुलगी आहे. पण मुलगा हवा या इच्छेपोटी शिक्षकाने एका 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करुन त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. अपहरण झालेल्या मुलीचे आई-वडील आरोपी शिक्षिकेच्या कृत्यात सहभागी होते. डोक्यावरील कर्ज फेडलं जातं आहे म्हणून मुलीला तिच्याशी लग्न करू द्यावं, असा त्यांचा विचार होता.
सांगवी पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. तसंच आरोपी शिक्षकाच्या पत्नीला अटक केली आहे. पीडित तरुणीचं अपहरण करून तिला सुरूवातीला येरमाळा येथे ठेवण्यात आलं होतं. तेथून स्वतःला वाचविण्यासाठी तरुणीने घडलेला सर्व प्रकार मोबाइलवर रेकॉर्ड करुन त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली व स्थानिक पोलिसांना पाठविली. पोलिसांनी या व्हिडीओ क्लिपद्वारे तरुणीला वाचविलं. पोलिसांच्या मदतीनंतर ती तरुणी आई-वडिलांच्या घरी गेली. पण तिथे आई-वडिलांनी तिला मदत न करता पुन्हा शिक्षकाच्या घरी जायला सांगितलं. अखेरीस 20 एप्रिल रोजी या तरूणीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणी शिक्षक व इतर 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिक्षकाच्या कुटुंबीयांना मुलगा हवा होता.त्यासाठी त्याने दुसरं लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. शिक्षकासाठी मुलगी शोधताना त्यांचा पीडित तरूणीच्या घरच्यांशी संपर्क झाला. त्यानंतर शिक्षकाने तरुणीच्या आई-वडिलांच्या डोक्यावर असलेलं 5 लाख रुपयांचं कर्ज फेडू व नवं घर खरेदी करून देऊ असं आमिष तिच्या आई-वडिलांना दाखविलं. व त्यासाठी मुलीशी लग्न लावून देण्याची अट त्या शिक्षकाने घातली.
दरम्यान पोलिसांनी आरोपीला, 366, 384, 385 कलमांतर्गत अटक केली आहे.