पुणे विद्यापीठाच्या बनावट प्रमाणपत्रांचा तपास लागेना!
By Admin | Published: September 1, 2014 02:11 AM2014-09-01T02:11:54+5:302014-09-01T02:11:54+5:30
सिंगापूर येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी काही परदेशी व भारतीय नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून सादर केल्याची माहिती समोर आली होती
पुणे : सिंगापूर येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी काही परदेशी व भारतीय नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून सादर केल्याची माहिती समोर आली होती. त्यावर पुणे विद्यापीठाने पोलिसांकडे या संदर्भात लेखी तक्रारही दिली होती. परंतु, दोन महिने उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती कुठलाही धागादोरा लागलेला नाही.
‘द रिपब्लिक आॅफ सिंगापूर’ यांच्याकडून पुणे विद्यापीठाला काही पदवी, पदविका गुणपत्रके व इतर प्रमाणपत्रे पडताळणीस प्राप्त झाली होती. या प्रमाणपत्रावर विद्यापीठाच्या काही माजी कुलगुरूंच्या बनावट सह्या व शिक्के असल्याचे दिसून आले होते. याचा तपास पोलिसांकडून करून घ्यावा, अशी मागणी विद्यापीठातील अधिकार मंडळाने केली होती. परंतु, पुणे पोलिसांना अद्याप सिंगापूर दूतावासाकडून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. पुणे पोलीस दोन महिन्यांपासून सिंगापूर दूतावासाशी संपर्कात आहेत. मात्र, परदेशात हा प्रकार घडला आहे. तसेच विद्यापीठाने पाठविलेली कागदपत्रे पोलीस तपासास पुरेशी नाहीत. त्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)