‘आर्ची’ला पाहण्यासाठी पुणेकर ‘सैराट’
By admin | Published: July 19, 2016 01:17 AM2016-07-19T01:17:27+5:302016-07-19T01:17:27+5:30
सैराटमधली आर्ची वडगावमध्ये येणार आहे, असे समजल्यावर सिंहगड रस्त्यावरुन जाणारे जरा थबकतच होते.
पुणे : सैराटमधली आर्ची वडगावमध्ये येणार आहे, असे समजल्यावर सिंहगड रस्त्यावरुन जाणारे जरा थबकतच होते. काहीजण जागा मिळेल तेथे वाहने लावून कालव्याच्या कडेने धावत सुटले. अखेर ती आली. रिमझिम पावसात तिने स्वत: एक झाड लावून वृक्षारोपणाचा प्रारंभ केला. तिच्याभोवती जमलेल्या शेकडो जणांनी तिची अदा मोबाईलमध्ये टिपली आणि आनंदात न्हाऊन निघाले.
मुठा कालव्यालगतच्या रिकाम्या जागेत अतिक्रमण व्हायला नको म्हणून स्थानिक नगरसेवक विकास दांगट पाटील, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे शंतनू जगदाळे यांनी त्या जागेत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. दांगट पाटील यांनी नागराज मंजुळे व सैराटमधील कलावंतांना निमंत्रण दिले. चाहत्यांची जास्त गर्दी नको म्हणून निमंत्रितांनाच या कार्यक्रमाला बोलावले. मात्र ही बातमी फुटलीच.
त्या गाडी भोवती प्रचंड गर्दी जमली. नागराज, पिंकू, आरबाज शेख, उर्फ सल्या यांना पाहण्यासाठी लोक महामार्ग उड्डाणपुलावरही थांबले. फन टाईम थिएटरसमोरही वाहतूक कोंडी होऊ लागली. चाहत्यांच्या सततच्या कोंडाळ्यामुळे, अतिउत्साहामुळे संयोजकांना भाषणे आटोपावी लागली.नागराज मंजुळे यांनी मोजक्या शब्दांत वृक्षारोपणाचा संदेश दिला.प्रत्येकाचे मोबाईल तेव्हा हे दृश्य टिपत होते.
एक रोप या कलावंतांच्या हस्ते लावल्यानंतर चाहत्यांच्या गर्दीतून आर्चीला बाहेर काढताना संयोजकांची पुरती दमछाक झाली. अखेर कलावंतांना कसेबसे वाहनात बसवून रवाना करण्यात आले.
(प्रतिनिधी)
>सकाळी अकरा वाजता कार्यक्रमस्थळी, उड्डाणपुलाखालच्या भागात गर्दी व्हायला सुरुवात झाली. महापौर, उपमहापौर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित झाले. तरुण मुलामुलींसह लहान मुले मोठ्या संख्येने कालव्याच्या भरावावर येऊ लागले. सर्व जण आर्चीला शोधत होते. पावसाच्या धारा अधूनमधून कोसळत होत्या. तासभर प्रतिक्षा झाल्यानंतर साडेबारा वाजता तिला, पिंकू राजगुरुला घेऊन येणारी गाडी आली. पोलिस दक्ष झाले.