दर्दी पुणेकरांनी अनुभवली '' सूर ज्योत्स्ना '' मैफल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:39 PM2019-04-22T16:39:10+5:302019-04-22T17:07:27+5:30
भक्ति संगीतापासून सुरु झालेल्या गीतमैफिलीत चित्रपटसंगीत, गझलांची रंग भरले. सूरज्योत्स्ना या सांगीतिक कार्यक्रमात सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुरांची पर्वणी रसिकांना मिळाली.
पुणे : '' सपनो मैं मिलता है, चप्पा चप्पा चरखा चले, सांज ढले, पाहिले न मी तुला '' यांसारख्या सुमधुर गीतांनी रसिकांची सायंकाळ केवळ सुरमयी' नव्हे तर सुरेशमयी झाली. भक्तीसंगीतापासून सुरु झालेल्या गीतमैफिलीत चित्रपटसंगीत, गझलांची रंग भरले. सूरज्योत्स्ना या सांगीतिक कार्यक्रमात सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुरांची पर्वणी रसिकांना मिळाली. ही सुरेल मैैफिल अनुभवण्यासाठी आलेल्या दर्दी पुणेकरांची गर्दी लक्षवेधी ठरली.
'' लोकमत'' च्या वतीने सागर गणपत बालवडकर प्रस्तुत कोहिनूर ग्रूपच्या सहयोगाने आयोजित ज्योत्स्नादेवी दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात ड्रम जेम्बेवादक शिखर नाद कुरैशी तसेच सुमधूर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणा-या सा रे ग म प फेम आर्या आंबेकर यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीतरत्न पुरस्काराने गौैरवण्यात आले. या कार्यक्रमाचे हे सहावे पर्व आहे.
तेजस्विनी साठे आणि सहका-यांनी नृत्याविष्कारातून सूरज्योत्स्ना वंदना सादर केली. जीवन की ज्योत्स्ना है, और ज्योत्स्ना का जीवन या गाण्यावर हा नृत्याविष्कार सादर झाला. यानंतर एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, खंडेराय प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सागर बालवडकर यांच्या हस्ते श्रध्देय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. यावेळी कोहिनूर ग्रूपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, सिंबायोसिस सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार, संचेती हॉस्पिटलचे संचालक डॉ.के.एच.संचेती, मगरपट्टाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, मुकूल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, अभय फिरोदिया, संगीता ललवाणी, सुशीला बंब, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमत च्या एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी सर्वांचे स्वागत केले आणि उदंड प्रतिसादाबद्दल पुणेकरांचे आभार मानले. ते म्हणाले, माझी पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांची संगीताप्रती समर्पण भूमिका होती. त्यांचे संगीतावर निस्सीम प्रेम होते. लहान मुलांना संगीताची गोडी लागावी, या उद्देशाने जवाहरलाल दर्डा संगीत अॅकेडमीची स्थापना करण्यात आली. '' सूर ज्योत्स्ना '' या सांगितिक पुरस्कारांच्या माध्यमातून देशातील गुणी, प्रतिभावान कलाकारांचा सन्मान करावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे हा उद्देश आहे. नागपूरपासून कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा ठिकाणी पुरस्कार सोहळे यावर्षी झाले आहेत. पुढील वर्षीपासून बंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई अशा ठिकाणीही पुरस्कार सोहळा नेण्याचा माझा मानस आहे. या माध्यमातून चळवळ निर्माण व्हावी, भारतीय संगीत सर्वदूर पोहोचावे, हाच यामागचा उद्देश आहे. गाण्यांतून निश्चितच प्रेरणा मिळेल, भारतीय संगीत घराघरात पोचेल आणि संस्कृतीला हातभार लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार सोहळयानंतर शिखर नाद कुरेशीने जेम्बेवादनातून रसिकांची मने जिंकली. आर्या आंबेकरने हृदयात वाजे समथिंग, हाक देता, तुला साद जाते या सुमधूर गाण्यांनी वातावरणात सुरेल रंग भरले. त्यानंतर पं. सुरेश वाडकर, सावनी रवींद्र, स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरसाज चढवला. सावनी रविंद्र हिने सुंदर ते ध्यान या संत तुकारामांच्या अभंग रचनेने वातावरण भक्तीमय केले. त्यानंतर होणार मी सून मी त्या घरची या मालिकेतील नाही कळले कधी जीव वेडावला, गो-या गालावरी चढली लाजेची लाली, नवरी आली ही गीते सादर केली.
स्वप्नील बांदोडकरच्या मला वेड लागले प्रेमाचे, गणाधीशा, वक्रतुंडा, गणपती बाप्पा मोरया या गाण्यांची रसिकांना पर्वणी मिळाली. राधा ही बावरी हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. श्रोत्यांमध्ये मिसळून स्वप्नीलने त्यांनाही गाण्यामध्ये सहभागी करुन घेतले आणि वातावरणात रंग भरले. गालावर खळी, डोळ्यात धुंदी, हे उडत्या चालीवरचे गीतही रंगले.
त्यानंतर पं. सुरेश वाडकर व्यासपीठावर आले आणिं उपस्थितांनी टाळयांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मैं हू प्रेमरोगी, और इस दिल मे क्या रखा है, सांज ढले गगन तले हम कितने एकाकी, सिने मे जलन क्यू है , लगी आज सावन की फिर वो झडी है, हुजूर इस कदर भी ना इतराके चलीए, तुमसे मिलके ऐसा लगा या सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाण्यांची जादू रसिकांनी नव्याने अनुभवली. सपनो मैं मिलता है ओ मुंडा मेरा, चप्पा चप्पा चरखा चले यांसारख्या गीतांवर रसिकांची पावले थिरकली. हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेल्या सुरेश वाडकर यांच्या एकसे बढकर एक गीतांना रसिकांची मिळणारी दाद आणि गीतांची होणारी फर्माईश यातून आजही त्यांच्या आवाजाचे गारूड रसिक मनावर कायम आहे याचा प्रचिती आली.
निलेश देशपांडे (बासरी), नितीन शिंदे (तबला, ढोलक, ढोलकी), पद्माकर गुजर (पखवाज), अभिजित भदे (वेस्टर्न रिदम), केदार परांजपे, सत्यजित प्रभू (कीबोर्ड)
आणि रितेश ओहोळ (गिटार) यांनी साथसंगत केली. लकीर मेहता आणि मंदार वाडकर यांनी ध्वनी संयोजन केले. मिलिंद कुलकर्णी आणि ओंकार दिक्षित यांनी निवेदन केले.
-----------------
लोकमत या पहिल्या क्रमांकाच्या दैैनिकाचा मी नियमित वाचक आहे. संस्मरणीय मैैफिलीला बोलावल्याबद्दल मी ह्यलोकमतह्णचे आभार मानतो. गुरुजी मागे बसून ऐकत असल्याने थोडे टेन्शनही आले आहे. मात्र, या अनोखी मैफिलाचा घटक बनता आल्याचा आनंदही आहे.
- स्वप्नील बांदोडकर
------------
रसिकांना आवर्जून नमस्कार. या पुरस्काराने सन्मानित होणे, ही भाग्याची गोष्ट आहे. ह्यसूरज्योत्स्नाह्णच्या निमित्ताने हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. संगीत क्षेत्रातील मेहनतीची जबाबदारीही वाढली आहे.
- आर्या आंबेकर
-------------
सर्वप्रथम ज्योत्स्ना ताईंच्या आठवणीना अभिवादन करतो. गायक कलाकारांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देतात, हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हालाही मिळावा. मी कोल्हापूरचा घाटावरचा माणूस आहे, दम खम अजूनही आहे. पुण्यात ज्याला प्रेम मिळते, त्याला जगात कुठेही त्रास होत नाही.
- पं. सुरेश वाडकर
-------------------------
कलांचा त्रिवेणी संगम
एकीकडे सूरज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळयांची मैैफिल रंगलेली असताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूला कलांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला. अमोल सूर्यवंशी यांनी शिल्प, प्रमोद आर्वी यांनी रांगोळी आणि राम देशमुख यांनी चित्र रेखाटत ज्योत्स्राभाभी दर्डा यांच्या आठवणींना आपल्या कलेतून उजाळा दिला.