सुरळीत वाहतुकीसाठी पुणेकर हायकोर्टात
By admin | Published: July 29, 2015 02:54 AM2015-07-29T02:54:55+5:302015-07-29T02:54:55+5:30
पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळले जावेत यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञान द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका
मुंबई : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळले जावेत यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञान द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेची दखल घेत मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांनी पुणे वाहतूक पोलीस विभागातील मनुष्यबळाची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
किशोर मनसुखानी व इतरांनी ही याचिका केली आहे. ट्राफिक जंक्शनच्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी. वाहतूक नियमांची अधिक सक्षमतेने अंमलबजावणी करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना गॅझेटसह अत्याधुनिक यंत्रे द्यावीत. तसेच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांना दंड करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे २०१०मध्ये पुणे शहरात झालेल्या रस्ते अपघाताचा तपशीलही याचिकेत देण्यात आला आहे. त्यानुसार २०१०मध्ये तेथे २ हजार अपघात झाले. त्यात ४३९ जणांचा बळी गेला. याचा अर्थ १०० अपघातांमागे २२ जणांचा जीव जातो. याची टक्केवारी मुंंबईत २.२, कोची येथे ९.३ तर इंदौर येथे ८.३ अशी आहे. या अपघातांची वाहतूक विभागाने गंभीर दखल घ्यायला हवी, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
या याचिकेत पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी करा, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले आहे.