‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा ‘घसा’ कोरडा

By admin | Published: August 3, 2016 12:34 AM2016-08-03T00:34:06+5:302016-08-03T00:34:06+5:30

जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले

PUNEKAR's 'throat' dry for 'Huge water' water | ‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा ‘घसा’ कोरडा

‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा ‘घसा’ कोरडा

Next

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले जात असतानाच; पुणे महापालिकेस दिवसाआड असलेली पाणीकपात मागे घेण्यासाठी अवघे २00 एमएलडी पाणी देण्यास पाटबंधारे विभागाकडून नकार दिला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या २0 दिवसांपासून हे पाणी कालव्याच्या माध्यमातून शहरातूनच जात असताना ते पालिकेला मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना दिवसाआड पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण रंगले असल्याने अवघ्या ‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा घसा कोरडाच असल्याचे चित्र दिसत आहे.
>हवे अवघे २00 एमएलडी पाणी
पाणीकपात मागे घेऊन पुणे शहराला दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस अवघ्या २00 एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस प्रतिदिन १२५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ११५0 एमएलडी आणि दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी ९५0 एमएलडी पाण्याची गरज आहे. हे जादा पाणी खडकवासला बंद जलवाहिनीतून घेणे शक्य आहे. त्यातच गेल्या २0 दिवसांपासून खडकवासला धरणातून दररोज ११00 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. या पाण्यातील अवघे २00 एमएलडी पाणी शहराला दिवसातून एकदा पुरविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आडमुठेपणा केला नसता तर २0 दिवसांपूर्वीच पाणीकपात मागे घेणे शक्य होते, अशी टीका होत आहे.
>श्रेयवादाचा फटका पुणेकरांना का ?
जूनच्या अखेरीस खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमध्ये अवघा १.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस सुरू झाल्याने धरणसाठा वाढण्यास सुरुवात झाली होती. या वेळी पाणीसाठा १0 टीएमसीच्या वर जाताच महापौरांनी घाईगडबडीने जलपूजन करून पाणीकपात मागे घेतली असल्याची घोषणा केली. मात्र, पालकमंत्री बापट यांनी त्यास नकार देत आॅगस्ट महिन्यात निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा चार टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे कालव्यातून जाणाऱ्या पाण्यातून पुणेकरांना जादा पाणी का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाणीसाठा १९ टीएमसीवर
मागील वर्षी खडकवासला धरणसाखळीत आॅक्टोबर २0१५ अखेर अवघे १५ टीएमसी पाणी होते. यातील केवळ साडेसात ते आठ टीएमसी पाणीच महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत वापरले आहे. मात्र, या वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांचा पाणीसाठा १९ टीएमसीच्या घरात पोहोचला आहे. तर आणखी दोन महिने चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तर ही धरणे ६४ टक्के भरलेली आहेत. त्यामुळे ही धरणे ८0 टक्के भरल्यानंतर पुढील पावसाचा विचार करून मर्यादित पाणीसाठा धरणांमध्ये ठेवावा लागणार असल्याने हे पाणी पुन्हा नदीत सोडले जाणार आहे.
त्यामुळे अत्ता पासून महापालिकेस दररोज 100 एमएलडी जादा पाणी मिळाल्यास पुणेकरांना सहज दररोज एकवेळ पाणी देता येणार आहे.

Web Title: PUNEKAR's 'throat' dry for 'Huge water' water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.