पुणेरी मिसळ : नको नको रे पावसा.. असा धिंगाणा अवेळी..!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:47 PM2019-10-11T13:47:22+5:302019-10-11T13:54:55+5:30
पुण्यात राज गर्जनेऐवजी मेघ गर्जना झाली आणि कार्यकर्त्यांसह साहेबांचीही तशी घोर निराशा झाली....
(कालच्या पावसानंतर केलेले चिंतन आणि चिंता. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची माफी मागून...)
नको नको रे पावसा...
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
फाडलीस मतांची झोळी
विरोधक पिटती टाळी ।। १।।
नको नाचू तडातडा
असा सभास्थळांवरून
नेते-कार्यकर्ते असे
पुन्हा आणू मी कोठून? ।। २।।
नको करू झोंबाझोंबी
माझा पक्षच नाजूक
हुकला नऊचा मुहूर्त
बंद माईकचे बोंडुक ।। ३।।
आडदांडा नको येऊ
झेपावत आकाशातून
माझे 'इंजिन' पाण्यात
नको टाकू भिजवून ।। ४।।
मुंबईत बोललो थोडे
माझे पुण्यात ऐक ना
चालले रे कार्यकर्ते
त्यांना माघारी आण ना ।। ५।।
चालले रे मतदार
जा रे आडवा धावत
वीजबाई, कडाडून
फिरव तू जनमत ।। ६।।
आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन ।। ७।।
थांब की रे थोडा वेळ
मज काहीच सुधरेना
जमवून लोक सारे
कशी करू मी गर्जना ।। ८।।
सत्ता येणारच नाही
विरोधक मी होईन
बंद व्हिडीओ तरीही
‘नवनिर्माण’ करेन ।। ९।।
नको आणू रे पावसा
असा झाकोळ अवेळी
दारामध्ये याआधीच
फिरे ‘ईडी’ची सावली... ।। १०।।
- अभय नरहर जोशी