पुणेरी मिसळ : आमचं ठरलंय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:51 PM2019-09-23T13:51:42+5:302019-09-23T13:58:03+5:30
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.. मेगा भरती आणि मेगा गळतीसह सर्वच पक्ष म्हणतायत आमचं ठरलंय...!
आमचं ठरलंय...
आश्वासनांचा पुन्हा पूर अन् पाणी भलतंच मुरलंय
कुणाला सांगू नका, पण आता आमचं ठरलंय!
पाण्याखाली गेलेत रूळ, ‘रेल्वे इंजिन’ थबकलंय
‘ईडी’पीडा टळली की धावायचं आमचं ठरलंय!
लढू म्हणणाºया कार्यकर्त्यांना नेत्यांनीच रोखलंय
काहीच नक्की ठरवायचं नाही, हेच आमचं ठरलंय!
‘भुजां’मधलं ‘बळ’ आम्ही आजमावून पाहिलंय
‘मॅचिंग मफलर’च घालायची, असं आमचं ठरलंय!
‘उद्धवा’च्या अजब सरकारनं ‘नारायणा’स अडवलंय
नाही तर ‘देवेंद्र’दरबारी जायचं, कधीच आमचं ठरलंय!
‘पॉवर’लेस होताच राजे-सरदारांनी आम्हाला सोडलंय
गप‘वार’ सोसून, उलट वार करण्याचं आमचं ठरलंय!
खोट्या निष्ठावंतांनी बारा‘मती’ला पुरतंच गुंगवलंय
जुना गडी म्हणे, लढेन नव्या गड्यांसह आमचं ठरलंय!
‘हैदराबादी बिर्याणी’नं बहुजनांना ‘वंचित’ ठेवलंय
वेगवेगळ्या ताटांतच जेवायचं नक्की आमचं ठरलंय!
मारत ‘पंजे’ परस्परांनाच आम्ही स्वत:ला थकवलंय
एकत्र येऊन लढायचंच नाही, असंच आमचं ठरलंय!
तळ्यात की मळ्यात, इथंच काहींचं गाडं अडलंय
वाऱ्याची दिशा पाहून ठरवू, हेच तूर्त आमचं ठरलंय!
- अभय नरहर जोशी