पुणेकरांची दिवाळी साजरी
By admin | Published: June 5, 2017 01:24 AM2017-06-05T01:24:06+5:302017-06-05T01:24:06+5:30
पाकिस्तानच्या एकामागोमाग विकेट पडत गेल्या, तसा प्रेक्षकांमधील उत्साह वाढत गेला़ पाकिस्तानचा शेवटचा गडी बाद होताच फटाक्यांची एकच बरसात होऊ लागली़
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सुरुवातीला पावसाच्या व्यत्ययानंतरही भारताने धावांचा डोंगर उभारल्यावर ही लढत आपण जिंकणार, याची जवळपास खात्री पटली असली तरी शेवटची विकेट मिळेपर्यंत आणि आता परत पाऊस येऊ नये, अशी कोट्यवधी भारतीयांची प्रार्थना निसर्गाने ऐकली आणि पाकिस्तानच्या एकामागोमाग विकेट पडत गेल्या, तसा प्रेक्षकांमधील उत्साह वाढत गेला़ पाकिस्तानचा शेवटचा गडी बाद होताच फटाक्यांची एकच बरसात होऊ लागली़
विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली़ जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, डेक्कन जिमखाना, तसेच पेठांमधील रस्त्यारस्त्यांवर तरुण-तरुणींची गर्दी जमली होती़ अनेकांनी हातात तिरंगा घेऊन मोटारसायकलवरून भरधाव जात घोषणा देत आनंद साजरा केला़
अनेक उत्साही तरुण भारतीय संघाची जर्सी घालून सामना पहात होते़ विजयानंतर त्याच जर्सीमध्ये जल्लोषात सहभागी झालेले दिसत होते़ मोटारीतील म्युझिक सिस्टिम मोठ्या आवाजात लावून त्याच्या तालावर तरुणाई नृत्यात दंग झाली होती़ काही तरुणांनी ढोलके आणले होते़ त्याच्या ठेक्यावर काही ठिकाणी एकच जल्लोष केला जात होता़ रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्त्यारस्त्यांवर हा जल्लोष सुरु होता़
भारत-पाकिस्तानमध्ये ‘राजकीय’ वॉर सुरू असताना या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट मॅचदरम्यान त्याचे पडसाद उमटले नसते तरच नवल! रविवारचा जुळून आलेला सुटीचा दिवस आणि भारत-पाकिस्तान मॅचचा तब्बल सव्वा वर्षाने रंगणारा सोहळा क्रिकेटप्रेमींनी ‘याचि देही याचि डोळा’ टीव्हीसमोर बसून अनुभवला. दुपारपासून शहरातील रस्त्यांवर तुरळक गर्दी जाणवत होती. सोसायट्यांसह क्रिकेट क्लबमध्ये मोठे स्क्रीन लावून एकत्रितपणे मॅच पाहाण्याचा आनंद पुणेकरांनी लुटला. सोशल मीडियावरही भारताला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या.
सध्या दोन्ही देशांमधील वातावरण चांगलेच तंग आहे़ हा उभय देशांमधील सामना क्रिकेटप्रेमीसाठी केवळ एक मॅच नव्हे, तर नेहमीच अस्मितेचा प्रश्न ठरला आहे. त्याचा प्रत्यय रविवारी अनुभवास मिळाला. रविवारी ही मॅच रंगणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींनी आठवडाभर आधीपासूनच प्लॅनिंग केले होते.
दुपारी शुकशुकाट; रात्री जल्लोष
मॅच तीन वाजता सुरू होणार असल्याने पुणेकरांनी सकाळच्या वेळेतच महत्त्वाची कामे उरकल्याने दुपारनंतर रस्त्यांवर गर्दीचे प्रमाण तुरळक होते. टीव्हीच्या शोरूमबाहेर मॅचचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. गेल्या वर्षी १९ मार्चला टी-ट्वेंटी वलर््ड कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच रंगली होती आणि भारताने हा डाव जिंकला होता... त्याचीच पुनरावृत्ती होणार, असा विश्वास बाळगत पुणेकरांनी भारताला चिअरअप करण्याचे एकही माध्यम सोडले नाही.
व्हॉट्सअॅपवरदेखील ‘शेवटची ओव्हर कोहली पांड्याला म्हणतो, ‘‘नाद्वेह... मानिबंधनम बहिरमुखम..., ‘भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, कालच घरी सांगून ठेवले होते, की टीव्हीच्या रिमोटला कुणी हात लावला तर समजा बाहुबलीच्या तलवारीला हात लावला, अशा कॉमेंट पडत होत्या़