पुणेकरांची सकाळ उजाडतेय सुरेल भजनांनी

By Admin | Published: June 9, 2017 11:15 PM2017-06-09T23:15:18+5:302017-06-09T23:15:18+5:30

दक्षिण पुण्यातील नागरिकांना दररोज सकाळी कर्नाटकी स्वरांमधील भजनांचा गोडवा अनुभवायला मिळत आहे.

Pune's morning sunl bhajtaye surail bhajanana | पुणेकरांची सकाळ उजाडतेय सुरेल भजनांनी

पुणेकरांची सकाळ उजाडतेय सुरेल भजनांनी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 : शहरीकरणाच्या झपाट्यामध्ये पहाटेची भुपाळी विरली असली तरी अद्यापही वासुदेवाची गाणी आणि टाळक-यांची सुरेल भजने अधूनमधून कानी पडत असतात. अशाच लोककलावंतांच्या सुरेल भजनांनी पुणेकरांची सकाळ गेल्या काही वर्षांपासून उजाडते आहे. विशेषत: कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, सहकारनगर या दक्षिण पुण्यातील नागरिकांना दररोज सकाळी कर्नाटकी स्वरांमधील भजनांचा गोडवा अनुभवायला मिळत आहे.
एकाचा हातामध्ये पेटी तर दुस-याच्या खांद्याला लटकवलेला तबला. एकजण पायजमा सद-यात तर दुसरा धोतर नेसलेला. कपाळी आणि कानाला खास कर्नाटकी पध्दतीचा गंध लावलेला. वेश असावा बावळा परी अंगी असाव्या नाना कळा  ही म्हण या दोघांच्या बाबतीत मात्र चपखल लागू पडते. एक गातो उत्तम आणि दुसरा वाजवतो अप्रतिम. लोककलाकारांच्या अंगभूत कलेचा जिवंत नमूना म्हणजे परशुराम महंत आणि त्यांचा सहकारी महेश कल्लाप्पा महंत. हे दोघे कोणी मोठे गायक वा तबलजी नाहीत. तर पुण्यातील कात्रजच्या एका वस्तीमध्ये राहणारे लोककलावंत आहेत. या दोघांच्या आवाजाने अनेक ह्यकानसेनांनाह्ण तृप्त केले आहे.
परशुराम आणि महेश मुळचे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील देवीहाळ तालुक्यामधील रहीवासी आहेत. शिरहाटी नावाच्या एका छोट्याशा खेड्यामधून ते पत्नी व भावासह पंधरा वर्षांपुर्वी पुण्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आले. कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदर यांचे ते अनुयायी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा भजन गाणे हा पारंपारिक व्यवसाय आहे. कोणाकडे काही मागायचे नाही, देवाची भजने गाऊन लोक झोळीमध्ये टाकतील ते घेऊन पुढे निघायचे हा यांनी आजवर पाळलेला नियम. परशुराम यांच्या मागील कित्येक पिढ्या भजन गातच लहानाच्या मोठ्या झाल्या. कुटुंबाच्या परंपरेने कला दिली मात्र सुबत्ता दिली नाही. त्यामुळे पोटासाठी पुण्याचा रस्ता धरलेल्या या दोघांनी कोणतेही नवे काम न करता आपली कला लोकांना दाखवून उपजिवीका करण्याचा निर्णय घेतला.
मागील पंधरा वर्षांपासून परशुराम, त्यांचा लहान भाऊ आणि महेश पुण्यातल्या गल्ली बोळात, सोसायट्यांमध्ये जाऊन भजन गातात. अनेकांची सकाळ कानावर पडणा-या सुरेल आवाजानेच होते. भल्या सकाळी प्रसन्न वातावरणात आल्हाददायक असे काही ऐकायला मिळाल्यामुळे नागरिकही हरखून जातात. परशुराम यांना तीन मुले आहेत. तिघेही शाळेतमध्ये जातात. त्यांची पत्नी रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये फोटो फ्रेम्स, अक्षर आणि आकड्यांचे चार्ट विकते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. वारीच्या या भक्तीमय वातावरणामध्ये महंत बंधू भजनांचे छोटे छोटे कार्यक्रमही करतात. पिढी दर पिढी चालत आलेला हा वारसा त्यांनी अगदी आत्मियतेने जपला आहे. त्यांना मंच लागत नाही, माईक लागत नाही कि स्पिकर लागत नाही. भरदार आणि दमदार आवाज, तबल्यावर असलेली हुकमी पकड असलेले महंत बंधूंचे गाणे ऐकल्यावर मात्र आपणही तन्मय होऊन जातो. हे दोघे रस्त्यावर गातात खरे; मात्र कसलेल्या गायकालाही टक्कर देऊ शकतील अशी कला त्यांची जोपासली आहे. अत्यंत सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार आणि तन्मयता ही यांच्या गायनामधील खास वैशिष्ट्ये आहेत. लोककलावंताचे आयुष्य कलेने ओतप्रोत भरलेले असते मात्र, उपेक्षा हीच त्यांची कमाई असते हे या दोघांकडे पाहिल्यावर जाणवत राहते.

Web Title: Pune's morning sunl bhajtaye surail bhajanana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.