पुणे होणार एसटीचेही ‘माहेरघर’
By admin | Published: April 22, 2016 01:18 AM2016-04-22T01:18:43+5:302016-04-22T01:18:43+5:30
राज्यातील प्रत्येक लहानमोठ्या शहरात एसटीची सुविधा देण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मोठ्या प्रमाणात
पुणे : राज्यातील प्रत्येक लहानमोठ्या शहरात एसटीची सुविधा देण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मोठ्या प्रमाणात बस सुविधा उपलब्ध करण्यावर सध्या भर देणार आहे. त्यासाठी तब्बल १ हजार नवीन गाड्या एसटीच्या ताफ्यात पुढील ६ महिन्यांत दाखल होतील. विशेषत: शिवनेरी आणि शिवशाही बसचा यात समावेश असेल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे क्रीडानगरी, विद्येचे माहेरघर, आयटी सिटी, स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरविणारे पुणे लवकरच एसटीचेही माहेरघर होणार आहे.
रावते म्हणाले, ‘‘एसटीची सर्वाधिक वाहतूक मुंबईपाठोपाठ पुण्यातून होते. राज्याच्या चारही दिशांना जोडणाऱ्या सर्व बस पुण्यातूनच जातात. मुंबईतील मराठी माणूस आणि इतर नागरिक उपनगरात स्थायिक होत आहे. मुंबईमध्ये एसटीच्या केंद्राच्या विस्तारीकरणासाठीे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे एसटीच्या विस्तारीकरणाला मुंबईमध्ये मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत एसटीचे विस्तारीकरण पुणे शहरातून होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील बस स्थानकांतून ज्याप्रमाणे राज्यात साधारण, निमआराम आणि शिवनेरी बसगाड्या जातात, त्याच धर्तीवर पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि स्वारगेट बस स्थानकांतून विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि कोकण या भागांत जाण्यासाठी बसगाड्यांची संख्या वाढविली जाणार आहे. तसेच, शिवशाही आणि शिवनेरी बससाठी पुण्यात स्वतंत्र वाहतूक केंद्र उभारण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली असल्याचेही रावते यांनी या वेळी स्पष्ट केले.