नीट परीक्षेत पुण्याचा तेजोमय वैद्य राज्यात दुसरा; कुटुंबातली तिसरी पिढी वैद्यकीय सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 12:11 AM2020-10-17T00:11:50+5:302020-10-17T00:14:00+5:30
आजोबा ,आई ,वडील ,भाऊ सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर व्हावे, असा विचार करून केली मेडिकल प्रवेशाची तयारी...
पुणे : आजोबा ,आई ,वडील ,भाऊ सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर व्हावे, असा विचार करून मेडिकल प्रवेशाची तयारी करणाऱ्या पुण्याच्या तेजोमय वैद्य याने नीट परीक्षेत देशात ४३ वा तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. तेजोमाय हा फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
वैद्य कुटुंबीयांचे स्वतःचे खाजगी हॉस्पिटल असल्यामुळे इयत्ता नववी पासूनच आपणही डॉक्टर व्हावे,असे तेजोमयला वाटू लागले. तेजोमयची आई डेंटिस्ट तर वडील ऑर्थोपेडिक्स आहेत. कोरोनामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेत यश मिळाले, असे तेजोमय सांगतो.
तेजोमय म्हणाला, घरात सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर म्हणून करिअर करावे, असे इयत्ता आठवी ,नववी पासून वाटू लागले. त्यामुळे मी त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. दररोज ज्या विषयाचा अभ्यास केला; तो शांतपणे आणि काळजीपूर्वक केला. सकाळी सहा वाजता उठून रात्री बारापर्यंत मिळालेल्या वेळामध्ये मी अभ्यास करत होतो. दुपारी काही वेळ फिरायला जात होतो.
मला गायनाची आवड असून मी शास्त्रीय संगीत शिकलो आहे. तसेच मला वाचायला बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळायला आवडते. माझ्या कुटुंबीयांनी, नीट नीट परीक्षेत शिक्षकांनी मला खूप प्रोत्साहन दिले. परीक्षेत मिळालेल्या यशाचा सर्वांना अभिमान वाटतो आहे, असेही तेजोमयने सांगितले