पुण्याचे काम नागपूर मेट्रोला नको

By admin | Published: October 20, 2016 01:04 AM2016-10-20T01:04:03+5:302016-10-20T01:04:03+5:30

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनकडे देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवर महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी जोरदार टीका करण्यात आली.

Pune's work is not for Nagpur Metro | पुण्याचे काम नागपूर मेट्रोला नको

पुण्याचे काम नागपूर मेट्रोला नको

Next


पुणे : शहरातील पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनकडे देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवर महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी जोरदार टीका करण्यात आली. प्रत्येक शहराच्या मेट्रोचे काम त्या-त्या शहराच्या नावाने असलेल्या कंपनीकडे सोपविण्यात आले असताना पुण्याच्या मेट्रोबाबत दुजाभाव का, अशी विचारणा करून मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करणारा ठराव मुख्य सभेकडून करण्यात आला. या ठरावाला भाजपा वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस व शिवसेनेने एकमताने पाठिंबा दिला.
महापालिकेत बुधवारी आॅक्टोबर महिन्यासह इतर ४ मुख्य सभांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याबाबत प्रशासनाला कळविण्यात आले आहे का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी प्रशासनाला केली. त्यानंतर पुणे मेट्रोची सर्व सूत्रे नागपूरच्या हाती देण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार हल्ला चढविला. महापौर प्रशांत जगताप यांनी या चर्चेत हस्तक्षेप करून ‘‘प्रशासनाने मेट्रोच्या कंपनीला निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडताना तो पुणे मेट्रो कॉर्पोरेशन या नावानेच मांडावा,’’ असे स्पष्ट आदेश या वेळी प्रशासनाला दिले.
अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘पुणे मेट्रोचे काम नागपूरकडे सोपवताय, आता नागपूरअंतर्गत पुणे महानगरपालिका असे नाव देणार का? जयपूर, नागपूर, बंगळुरू, दिल्ली या शहरांच्या मेट्रोची नावे त्या-त्या शहराच्या नावे असताना पुण्याबाबतच वेगळा निर्णय का घेतला जात आहे?’’
सभागृह नेते शंकर ूर्फ बंडू केमसे म्हणाले, ‘‘पुणे नागपूरपेक्षा सर्व बाबतींत श्रेष्ठ आहे. पुण्याबाबत असा भेदभाव केला जाणार असेल, तर येणाऱ्या निवडणुकीत लोकही वेगळा निर्णय घेतील.’’
मनेसेचे गटनेते किशोर शिंदे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की पुणेकरांच्या मागणीवरून आम्ही तिथल्या मेट्रोचे काम नागपूरला देत आहोत. अशी मागणी कोणी केली आहे ते त्यांनी सांगावे.’’
पीआयबीने दिलेल्या सुधारित मान्यतेनुसार मेट्रोच्या एकूण खर्चाच्या २० टक्के केंद्र, २० टक्के राज्य व १० टक्के खर्च पुणे व पिंपरी महापालिका यांना उचलावा लागणार आहे, असे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी स्पष्ट केले. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देण्याच्या प्रश्नांबाबत बोनाला यांनी कोणताही खुलासा केला नाही. नगरसेविका रूपाली पाटील, रवींद्र माळवदकर यांनीदेखील मेट्रोवरून प्रशासनाला धारेवर धरले.
(प्रतिनिधी)
मेट्रोला पुण्याचे नाव देण्यास भाजपाचा विरोध
पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा निषेध करण्याचा ठराव मुख्य सभेमध्ये मतदानासाठी टाकण्यात आला. त्या वेळी फक्त भाजपाने या ठरावाच्या विरोधात मतदान केले. हा ठराव ६१ विरुद्ध १२ मतांनी मंजूर करण्यात आला. मात्र, भाजपाने ठरावाला विरोध केल्याने मेट्रोला पुण्याचे नाव देण्यास भाजपाचा विरोध असल्याची टीका राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेकडून करण्यात आली.
>पप्पा, तुम्ही पुण्याचे,
मी नागपूरचा कसा?
पुणे मेट्रोला नागपूरचे नाव देण्याच्या प्रकारामुळे
उद्या तुमची मुलं तुम्हाला विचारतील, ‘‘पप्पा, तुम्ही पुण्याचे, मी नागपूरचा कसा?’’ असे अरविंद शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजपची दहशत कशी आहे बघा. एकही नगरसेवक यावर बोलत नाहीये, असे शिंदे यांनी सांगितले.
>नागपूर मेट्रोला काम देण्याच्या विरोधात सर्वपक्षीय निदर्शने
पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्यात येऊ नये. पुणे मेट्रो कॉर्पोरेशनमार्फतच पुण्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वपक्षीय निर्दशने (भाजपा वगळता) करण्यात येणार आहेत, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Web Title: Pune's work is not for Nagpur Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.