भितीदायक स्वप्न पडत असल्याने पुण्यातील तरुणाची आत्महत्या
By admin | Published: August 13, 2016 02:36 PM2016-08-13T14:36:35+5:302016-08-13T14:36:35+5:30
सतत पडणा-या भितीदायक स्वप्नांना कंटाळून एमबीएच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Next
>एमबीएचा विद्यार्थी : वडगाव बुद्रुकमध्ये घडली घटना
ऑनलाइन लोकमत
पुणे : सतत पडणा-या भितीदायक स्वप्नांना कंटाळून एमबीएच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडगाव बुद्रुकमध्ये घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्याने लॅपटॉपमध्ये लिहून ठेवलेल्या सुसाईट नोटवरुन आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे.
संकेत राजाराम कामठे (वय 24, रा. दांगट गार्डन सोसायटी, वडगाव बुद्रकु, सिंहगड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. एकुलता एक मुलगा असलेला संकेत कोथरुडमधील एमआयटी महाविद्यालयात एमबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. तसेच कोंढव्यातील एनआयबीएममध्ये नोकरीही करीत होता. त्याचे आईवडील घरीच असतात. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याला अर्धशिशीचा त्रास होता. त्यामुळे त्याने डोके सारखे दुखायचे. यासोबतच त्याला नेहमी भितीदायक स्वप्नं पडत असत. यामुळे त्याला त्रास होत असल्याचे त्याने अनेकदा कुटुंबियांना सांगितले होते. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास वडिलांनी त्याच्या खोलीचे दार उघडले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षात फोन करुन मदत मागितली. सिंहगड रस्ता पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेऊन दरवाजा तोडला.
त्यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. संकेतने लॅपटॉपवर सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्याचा मोबाईलमध्येही फोटो काढून ठेवलेला होता. या नोटमध्ये त्याने ‘मला भयानक स्वप्न पडत होते. त्यामुळे मी अनेकदा दचकून उठायचो. मला त्याचा खूप त्रास होत आहे. माझ्या आईवडीलांना त्रास देऊ नये. सॉरी आई-पप्पा.’ असे त्याने लिहून ठेवले आहे.