न्यायालयातील शिक्षेच्या प्रमाणात ६-१५ टक्क्यांनी वाढ
By admin | Published: March 15, 2017 08:44 AM2017-03-15T08:44:22+5:302017-03-15T08:44:22+5:30
नाशिकमध्ये दोन वर्षांपासून न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ६ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले असून, पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या संशयितांची संख्या ७९५ आहे.
ऑनलाइन लोकमत/विजय मोरे
नाशिक, दि.15 - शहर पोलीस आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये किरकोळ व गंभीर अशा दोन्ही स्वरूपातील हजारो गुन्ह्यांची नोंद दरवर्षी होते. यापैकी अनेक गुन्ह्यांतील संशयितांची न्यायालयात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली जाते. मात्र गत दोन वर्षांपासून न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ६ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले असून, पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या संशयितांची संख्या ७९५ आहे. दरम्यान, काळानुरूप पोलिसांची बदललेली तपासाची पद्धती, सरकारी वकिलांचे परिश्रम व साक्षीदार या तिघांमुळे शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिक शहरात चोरी, हाणामारी, घरफोडी, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न, खून, बलात्कार, विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल होत असतात. या गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होते. २०१५ साली २५ प्रकारचे गुन्हे मिळून ३ हजार ६२० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ६९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तर २०१६ मध्ये गुन्ह्यांमध्ये घट होऊन ३ हजार ५३८ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी २ हजार १९६ गुन्हे उघडकीस झाले. न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये निकालही लागले आहेत़ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा करण्याचे प्रमाण अधिक आहे.
४५३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, ६७५ संशयिताना पुराव्यांअभावी निर्दोेष सोडण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण २०१४ साली ३२.१० टक्के होते. त्यानंतर २०१५ मध्ये यात घट झाल्याने ते प्रमाण २५.३१ टक्के झाले; मात्र २०१६ मध्ये यात वाढ होऊन ४०.१६ टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली आहे. सत्र न्यायालयातील गुन्ह्यांमध्येही शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ३३ गुन्हेगारांना शिक्षा झाली तर १२० गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. २०१५ चा विचार करता गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
न्यायालयात साक्ष व पुरावे महत्त्वाचे असतात़ मात्र, बहुतांशी साक्षीदारांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती नसते. त्यामुळे साक्षीदारांकडून न्यायालयात साक्ष देतांना चुका होतात. या चुका होऊ नये यासाठी न्यायालयात असलेल्या प्रॉसिक्यूशन सेलमार्फत साक्षीदारांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली जात असल्यामुळे त्यसांच्या मनातील भीती नाहीशी होते, व चुका कमी होतात. याचा चांगला परिणाम हो दोषसिद्धीमध्ये होत असल्याचे दिसून येते. - दत्तात्रय कराळे, उपायुक्त (गुन्हे) नाशिक़
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील शिक्षेचे प्रमाण
न्यायालय शिक्षा निर्दोष रद्द वर्ष (टक्केवारी)
२०१४ २०१५ २०१६
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ४५३ ६७५ ३३७ ३२.१० २५.३१ ४०.१६
जिल्हा व सत्र न्यायालय ०३३ १२० ००० ०९.४० १५.५८ २१.५७