शिक्षेचा फास आवळला
By Admin | Published: April 6, 2016 04:27 AM2016-04-06T04:27:17+5:302016-04-06T04:27:17+5:30
राज्यात सर्वाधिक गुन्हे सिद्ध होणाऱ्या आयुक्तालयांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दोन वर्षात तब्बल १२७९ गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे.
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
राज्यात सर्वाधिक गुन्हे सिद्ध होणाऱ्या आयुक्तालयांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दोन वर्षात तब्बल १२७९ गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे. पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाबरोबर पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे.
नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. परंतु पुरेसे पुरावे हाती न लागल्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील आरोपी न्यायालयातून मोकाट सुटतात. शिवाय गुन्हे सिद्ध होत नसल्याने सामान्य नागरिकही नाराजी व्यक्त करतात. यामुळे राज्यभर गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्याकडे पोलिसांकडून लक्ष देण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील सर्वाधिक दोन वर्षामध्ये प्रथम वर्ग न्यायालयात २३५२ गुन्हे निकाली लागले असून त्यापैकी ८१५ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. तर सत्र न्यायालयात २३३ गुन्ह्यांचा निकाल लागला असून ४२ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे.
अटक आरोपींना शिक्षा लागलेल्या गुन्ह्यांमध्ये बालकांचा लैंगिक अत्याचार, हत्या, जबरी दरोडा, बलात्कार, अमली पदार्थ तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांसह हाणामारी, अपघात तसेच चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. एखाद्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षानुवर्षे हे खटले सुरु असतात. तेवढ्या कालावधीत आरोपी विरोधातील पुराव्याचे जतन करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. यावेळी भेडसावणाऱ्या सर्व परिस्थितीवर मात करुन तपास अधिकाऱ्यांनी मांडलेल्या भक्कम पुराव्यामुळे त्या आरोपींना शिक्षा लागली आहे.
पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ एकचे शहाजी उमाप, परिमंडळ दोनचे विश्वास पांढरे व इतर अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढत आहे.
पोलीस एखाद्या गुन्ह्याचा तपास पटकन लावतात. परंतु तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध होत नाहीत. अनेक वेळा साक्षीदार त्यांची साक्ष बदलतात, काही प्रकरणांमध्ये तपासात त्रुटी राहिलेल्या असतात. यामुळे गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. आरोपींना शिक्षा व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी पोलीस विशेष प्रयत्न करीत असल्याचे यातून उघड होत आहे.