महाबीज देणार पंजाब कृषी विद्यापीठाला बियाणे!
By admin | Published: November 4, 2015 02:27 AM2015-11-04T02:27:37+5:302015-11-04T02:27:37+5:30
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आता राज्याबाहेरही व्यवसायाचा विस्तार करीत आहेत. पंजाब कृषी विद्यापीठाला एक हजार क्विंटल संकरित मक्याचे बियाणे महाबीज
- नितीन गव्हाळे, अकोला
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आता राज्याबाहेरही व्यवसायाचा विस्तार करीत आहेत. पंजाब कृषी विद्यापीठाला एक हजार क्विंटल संकरित मक्याचे बियाणे महाबीज उपलब्ध करून देणार आहे.
पंजाब कृषी विद्यापीठाने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात महाबीजसोबत बियाणे खरेदीचा करार केला असून, त्यानुसार महाबीज पंजाबमधील शेतकऱ्यांना मक्याचे बियाणे उपलब्ध करून देणार आहे. संकरित मका पीएमएच १ या बियाण्याचे उत्पादन आंध्र प्रदेशातून करण्यात येणार आहे. आपल्या वाणांचा प्रचार आणि प्रसार देशातील इतर राज्यांमध्ये व्हावा, यासाठी महाबीजने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात घटलेल्या मागणीनुसार शिल्लक राहिलेले बियाणे इतर राज्यांमधील हवामान व पर्जन्यमानानुसार प्रक्रिया करून उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजने पुढाकार घेतला आहे.
महाबीजने यापूर्वी आसाम, पश्चिम बंगालला त्यांच्या मागणीनुसार ज्यूट, धान बियाण्यांचा पुरवठा केला. आता पंजाब कृषी विद्यापीठाकडून मका बियाण्याचा पुरवठा होत आहे.
भविष्यातील संधींचा शोध घेण्याच्या उद्देशाने पंजाब कृषी विद्यापीठासोबत करण्यात आलेला करार हे व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने टाकण्यात आलेले पहिले पाऊल आहे. त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांनाही होऊ शकेल.
- अरुण उन्हाळे, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज
मागणीनुसार पंजाबला लवकरच बियाण्यांचा पुरवठा केला जाईल. केवळ राज्यापुरतेच मर्यादित न राहता, इतर राज्यांमध्ये व्यवसायाचे विपणन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- एस.एम. पुंडकर, महाव्यवस्थापक (उत्पादन), महाबीज