पंजाब उपांत्य फेरीत--४० व्या अखिल भारतीय वीज मंडळ कबड्डी स्पर्धा

By admin | Published: July 10, 2015 10:46 PM2015-07-10T22:46:21+5:302015-07-10T22:46:21+5:30

महावितरण पराभूत : दिल्लीसह कर्नाटक, हरियाणाही अंतिम चारमध्ये

In the Punjab semi-finals - 40th All India Electricity Board Kabaddi Tournament | पंजाब उपांत्य फेरीत--४० व्या अखिल भारतीय वीज मंडळ कबड्डी स्पर्धा

पंजाब उपांत्य फेरीत--४० व्या अखिल भारतीय वीज मंडळ कबड्डी स्पर्धा

Next

कोल्हापूर : दिल्ली बीएसईएस, कर्नाटक, पंजाब एस.पी., हरियाणा पीसीएल यांनी शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत ४० व्या अखिल भारतीय वीज क्रीडा कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जिद्द आणि चुरशीचा खेळ करूनही यजमान महावितरणचा संघ बलाढ्य पंजाब संघाकडून हरला. आज, शनिवारी सकाळच्या सत्रात उपांत्य, तर सायंकाळी चार वाजता अंतिम फेरीतील सामना होणार आहे. कोल्हापुरात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत पहिला उपांत्यपूर्व सामना दिल्ली बीएसईएस विरुद्ध उत्तरप्रदेश या दोन संघांत झाला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात उत्तर प्रदेशकडून अमितकुमार शर्मा याने उत्कृष्ट चपळ खेळ केला. मात्र, त्याची ही खेळी दिल्लीच्या खेळाडूंनी असफल ठरविली. दिल्लीकडून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या धिप्पाड संजीवकुमारने वेगवान चढाई करीत आपल्या संघास मोठी आघाडी मिळवून देत सामना २० गुणांनी जिंकून दिला. दुसरा सामना कर्नाटक विरुद्ध तेलंगणा यांच्यात झाला. हा सामना कर्नाटकने २९ विरुद्ध ९ गुणांनी जिंकला.
तिसरा सामना बलाढ्य पंजाब एस. पी. विरुद्ध यजमान महावितरण यांच्यात झाला. तो अत्यंत अटीतटीचा आणि क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा झाला. या सामन्यात महावितरणकडून अजय शिंदे, राहुल सणस, सुनील सावंत यांनी कडवी झुंज दिली; तर पंजाबकडून भूपिंदरसिंह, राजा यांनी उत्कृष्ट चढाई केली. सामन्यात पहिल्या हाफपर्यंत पंजाबचे १३, तर महावितरणचे १० गुण अशी स्थिती होती. दुसऱ्या हाफमध्ये २४ विरुद्ध १६ आणि अखेरच्या काही वेळात पंजाबचे २५ आणि महावितरणचे १९ गुण होते. अखेरच्या वेळेत पंजाबकडून भूपिंदरसिंह याने जोरदार चढाई करीत आपल्या संघाचे ३२ गुण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेर हा सामना पंजाबने ३२ विरुद्ध २३ गुणांनी जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
अखेरचा चौथा सामना हरियाणा पीसीएल विरुद्ध तमीळनाडू डीसीएल यांच्यात झाला. यात तमीळनाडूकडून पी. गणेशनने, तर हरियाणाच्या सज्जनकुमार, अनिलकुमार, सत्येनकुमार यांनी उत्कृष्ट चढाया व बचाव केला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये हरियाणाचा १, तर तमीळनाडूचे ५ गुण होते. हरियाणाने खेळात आक्रमकता आणत अखेर हा सामना १५ विरुद्ध १३ गुणांनी जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.


एका हाताच्या अमितकुमारची झुंज व्यर्थ
उत्तर प्रदेश संघातील आघाडीचा चढाईपटू व वयाच्या पाचव्या वर्षी गवत कापायच्या यंत्रात उजवा हात गमावलेल्या अमितकुमार शर्मा याने बलाढ्य दिल्ली संघाविरोधात जोरदार चढाया करीत त्यांना नाकीनऊ आणले होते. तो उत्तरप्रदेश वीज मंडळात लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्याने यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून, तो कबड्डी घालताना प्रतिस्पर्धाच्या डोक्यावरून अचानक उडी मारण्यात तरबेज आहे. शुक्रवारी त्याने कबड्डीतील अनेक चाली दाखवीत उपस्थितांची वाहवा मिळविली.

उपांत्य फेरीतील लढती अशा
पहिली लढत सकाळी नऊ वाजता कर्नाटक विरुद्ध दिल्ली यांच्यात, तर दुसरी लढत पंजाब विरुद्ध हरियाणा यांच्यात होणार आहे.

Web Title: In the Punjab semi-finals - 40th All India Electricity Board Kabaddi Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.