पंजाबच्या शेतकऱ्यास हॉटेलमध्ये बेशुध्द करुन १० हजार डॉलरना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:00 PM2019-05-13T21:00:02+5:302019-05-13T21:00:24+5:30
मामाकडे नोकरीसाठी जायचे म्हणून गुरविंदर प्रयत्न करत असताना पंजाबच्याच भटिंडा येथील स्वर्ण सिंग उर्फ सिम्मी याच्याशी त्याची चार - पाच महिन्यांपूर्वी गावातच ओळख झाली.
मीरारोड : पंजाबच्या शेतकऱ्यास नोकरीसाठी कॅलिफॉर्निया येथे पाठवण्याच्या आमिषाने त्याला काशिमीरा येथील हॉटेलात बेशुध्द करुन त्याच्याकडील १० हजार अमेरीकन डॉलर ( साडे सहा लाख ) व पासपोर्ट चोरुन पळणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुरविंदर जगपाल सिंग (२८) रा. पटियाला, पंजाब शेतकरी असुन त्यांचे मामा बलविंदर सिंग हे गेल्या ३०-३५ वर्षां पासुन कॅलिफॉर्निया येथे मद्य विक्रीचा व्यवसाय करतात. मामाकडे नोकरीसाठी जायचे म्हणून गुरविंदर प्रयत्न करत असताना पंजाबच्याच भटिंडा येथील स्वर्ण सिंग उर्फ सिम्मी याच्याशी त्याची चार - पाच महिन्यांपूर्वी गावातच ओळख झाली. स्वर्णने पासपोर्ट एजंटचे काम करणाऱ्या बलजिंदर सिंग याचा नंबर दिला.
गुरविंदरचा पासपोर्ट पाच वर्षांपुर्वी काढला असल्याने त्याने अमृतसर मधील रमेश नावाच्या इसमास भेटण्यास सांगितले. रमेशने त्याच्या कडुन ३ हजार घेत खरा पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले. बलविंदरने १५ दिवसांपूर्वी गुरविंदरला फोन करुन ९ मे रोजी त्याला कॅलिफॉर्नियाला पाठवणार असुन १० हजार अमेरीकन डॉलर सोबत लागतील. तेथे पोहचल्यावर त्याला खर्च म्हणून ३२ लाख रुपये द्यायचे असे सांगितले.
गुरविंदर कडे मामाने दिलेले ४ हजार डॉलर होते. आणखी ६ हजार डॉलर उभारण्यासाठी त्याने गहु विक्रीतुन आलेले ४ लाख २७ हजार रुपये बदलुन घेत त्याचे ६ हजार डॉलर घेतले. ९ मे रोजी तो परदेशात नोकरीला जाण्यासाठी मुंबई वरुन जायचे म्हणून तो रमेशसह दुपारी अमृतसर विमानतळावर आला. तेथे त्याच्या नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या व निघुन गेले. तो व रमेश मुंबई विमानतळावर पोहचला असता तेथे रमेशचे अन्य तिघे साथीदार भेटले. तेथुन रमेशने त्याला साथीदारांसह काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर असलेल्या सपना लॉजमध्ये सायंकाळी आणले.
गुरविंदरला भूक लागली म्हणुन रमेशच्या सांगण्यावरून साथीदारांनी जेवण आणि दारुची बाटली आणली. रात्री दहाच्या सुमारास जेवता जेवता तो बेशुध्द झाला. ११ मे रोजी जेव्हा शुध्द आली तेव्हा तो एका रुग्णायात उपचार घेत होता. रमेश व त्याच्या साथीदारांनी त्याला बेशुध्द करुन बॅगेतील १० हजार अमेरीकन डॉलर व पासपोर्ट चोरुन नेले होते. या प्रकरणी काशिमीरा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेत आहेत. काही दिवसांपुर्वी हरयाणाच्या एका व्यक्तीस फिरायला जायचे सांगुन काशिमीरा भागातील एका लॉज मध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुध्द करत लुटले होते.