अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 05:49 AM2023-06-01T05:49:40+5:302023-06-01T05:50:18+5:30

बारामती मेडिकल कॉलेजलाही अहिल्यादेवींचे नाव

punyashlok Ahilya Devi s name to Ahmednagar now Chief Minister Eknath Shinde's big announcement | अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

googlenewsNext

चोंडी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी चोंडीत केली. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा यावेळी केली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८वा जयंती सोहळा येथे शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा झाला. व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद 
पडळकर, अण्णा डांगे, विकास महात्मे आदींची उपस्थिती होती. सोहळ्यात प्रारंभी राम शिंदे व पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 

आरक्षणाबाबत घोषणाबाजी
जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित असलेल्या समुदायाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असताना ‘धनगर समाजाला आरक्षण द्या’ अशी घोषणाबाजी केली. मात्र, शिंदे, फडणवीस यांनी भाषणात आरक्षणाबाबत उल्लेख केला नाही. 

नेमके नामकरण काय असणार? 
गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्याची मागणी केली होती. 
फडणवीस यांनीही आपल्या भाषणात याच नावाचा उल्लेख केला. मात्र त्यांनी सभेनंतर केलेल्या ट्वीटमध्ये अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यानगर’ असेल असे म्हटले आहे. 
मुख्यमंत्र्यांनी भाषणात ‘अहिल्यादेवी होळकर’ अशा नावाचा उल्लेख केला तर ट्वीटमध्ये ‘अहिल्यादेवीनगर’ असे म्हटले. त्यामुळे नवीन नाव नेमके काय असणार? याबाबत संभ्रम असून ही बाब शासन आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे. 

उपमुख्यमंत्र्यांची विनंती अन्...
फडणवीस यांनी आपल्या भाषणात ‘सरकारने औरंगाबाद, उस्मानाबादचे नामकरण केले. आता तुमच्या नेतृत्वात या जिल्ह्याचे नामकरण झाले पाहिजे’ असा उल्लेख मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. 
त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व मोठे होते. 
नामांतरामुळे या जिल्ह्याचे नावही हिमालयाएवढे उंच होणार आहे. गतवर्षी ज्यांनी चोंडीत येऊन राजकारण केले त्यांना आम्ही सत्तेतून घालविले, अशी टिप्पणी त्यांनी शरद पवार यांना उद्देशून केली. 

अहिल्यादेवींची ३००वी जयंती जगाला हेवा वाटेल, अशा पद्धतीने साजरी करू. अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. धनगर समाजाच्या ज्या छोट्या-मोठ्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. 
एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री 

हिंदवी स्वराज्याचा विस्तार अहिल्यादेवींनी देशभर केला. त्यांनी शासनाच्या नव्हे तर स्वत:च्या तिजोरीतून हिंदू धर्मस्थळांचा जीर्णोद्धार केला. 
देवेंद्र फडणवीस, 
उपमुख्यमंत्री  

Web Title: punyashlok Ahilya Devi s name to Ahmednagar now Chief Minister Eknath Shinde's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.