पुरंदरे यांच्या पुरस्काराला नेमाडे, कोत्तापलेंचा विरोध
By admin | Published: August 16, 2015 02:29 AM2015-08-16T02:29:12+5:302015-08-16T02:29:12+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरुन आधीच वादंग सुरु असताना आता या पुरस्काराला ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरुन आधीच वादंग सुरु असताना आता या पुरस्काराला ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे आणि भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापले यांनी विरोध केला आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र लिहून त्यात हा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ समितीमध्ये एकाही तज्ज्ञ इतिहास संशोधक नसल्याचे म्हटले आहे. तसेच, पुरंदरे यांच्या इतिहास लेखनाची आणि ऐतिहासिक भूमिकांची तपासणी केली नसल्याचाही आरोप केला आहे. हा पुरस्कार रद्द करावा अशी मागणी करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, अंनिसच्या मुक्ता दाभोलकर, भारतीय महिला फेडरेशनच्या मेघा पानसरे, शिवप्रेमी जनजागरण समितीचे अध्यक्ष मुकुंद काकडे आणि
महात्मा ज्योतीराव फुले समता प्रतिष्ठानचे दादासाहेब नाईकनवरे यांनी पत्रावर स्वाक्षरी करुन पाठिंबा दर्शविला आहे.
या पत्रात जातीय तेढ निर्माण करणारे विचार आणि लेखन ही कोणत्याही अर्थाने समाजसेवा ठरत नाही. तरी वरील प्रकरणी महाराष्ट्रातील जनमानसात शासनाविरुद्ध संताप असून शासनाने हा पुरस्कार देऊ नये. अन्यथा राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय तसेच महाराष्ट्रातील बहुजन स्त्रियांची मानहानी व चारित्र्यहनन होण्यास शासन जबाबदार असेल असे म्हटले आहे. राज्यासाठी भूषणावह कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार दिला जात असावा, असा महाराष्ट्रातील जनतेचा आजतागयत समज आहे. मात्र नियोजित पुरस्कारार्थी पुरदंरे हे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व या पुरस्कारासाठी निवडणे म्हणजे पुरस्काराचे अवमूल्यन करणे तर आहे.
‘जेम्स लेन’ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक लेखन केले. त्या पुस्तकात पुरंदरेचे प्रास्तावनेत सहकार्याबद्दल आभार मानलेले आहेत, ही गंभीर बाब आहे. तसेच, पुरंदरे यांच्या जातीयवादी लिखाणाविरुद्ध कोल्हापूर कोर्टात अब्रूनुकसान भरपाईचा दावा सुरु आहे. असे असतानाही केवळ वाढलेल्या वयाचा विचार करुन पुरस्कार देणे गैर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच बहुजन स्त्रिया यांचेबद्दल अत्यंत अनैतिहासिक आहे. कोणतेही समकालीन पुरावे नसताना त्यांनी केलेले लिखाण कट्टरवादाला खतपाणी घालणारे असून शिवरायांसारख्या युगपुरुषाची प्रतिमा मलिन करणारे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरंदरेंच्या विकृत लिखणाला राजमान्यता मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या विकृतीकरणाला पाठबळ देण्यासारखे आहे. याविषयी स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून यावर मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही.
- नागनाथ कोत्तापल्ले, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती