पुरंदरच्या ‘टेकआॅफ’लाही विरोध!
By admin | Published: September 13, 2016 01:28 AM2016-09-13T01:28:17+5:302016-09-13T01:28:17+5:30
पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे
भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. पुरंदर तालुक्याची संपूर्ण देशात गोड, चवीष्ट अंजीर व अवीट गोडीची सीताफळे अशी असणारी ओळख यामुळे पुसणार असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जागेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणच्या पडीक व गायरान जागेवर विमानतळ व्हावे, फळबागांच्या क्षेत्रांचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात माळरान क्षेत्र असल्याने विमानतळ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, हा परिसर गोड, चवीष्ट अंजीर, अवीट गोडी असणारी सीताफळे यासाठी देशात प्रसिद्ध आहे. फळबागेसाठी येथील हवामान उपयुक्त आहे. येथील सर्वसामान्य शेतकरी याच फळबागेच्या जोरावर तग धरून उभा आहे. पाणी कमी पडू नये, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेततळीही केलेली आहेत. यातूनच उत्पादन वाढवले आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांबरोबर विविध संघटना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत.
(वार्ताहर)
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल, परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका.
- मस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्ष,
लहुजी शक्ती सेना