‘त्या’ पैशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी
By admin | Published: November 18, 2016 05:06 AM2016-11-18T05:06:47+5:302016-11-18T05:06:47+5:30
मोठ्या रकमेतून बिटकॉइन चलनाद्वारे महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केल्याची बाब आता पुढे आली आहे.
पंकज रोडेकर/ ठाणे
कॉल सेंटरमधील व्यवहारांद्वारे अमेरिकन नागरिकांकडून फसवणुकीने व जबरदस्तीने वसूल केलेल्या मोठ्या रकमेतून बिटकॉइन चलनाद्वारे महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केल्याची बाब आता पुढे आली आहे. ही बाब सिद्ध करणे पोलिसांना शक्य झाले, तर या प्रकरणातील सूत्रधारांना जेरबंद करण्याकरिता सबळ पुरावे हाती लागतील, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे.
मीरा रोड येथील बहुचर्चित कॉल सेंटर घोटाळा प्रकरणात हवालाद्वारे पैशांचे व्यवहार केले गेले. या माध्यमातून प्राप्त झालेल्या मोठ्या रकमांचा विनियोग बिटकॉइन या चलनाचा वापर करून करोडो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. इंटरनेटद्वारे बिटकॉइन चलनाचा वापर झालेला ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उघडकीस येणारा बहुधा हा पहिलाच गुन्हा ठरणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मीरा रोड येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्र. १ ला मिळाल्यावर धाड टाकून पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केली होती. तेथील संगणकही ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीत या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या राज्यांतील लिंकसमोर आल्या. आतापर्यंत ५० जणांना अटक केली असली तरी प्रमुख सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॉगी याच्यापर्यंत पोलिसांना पोहोचता आलेले नाही. मात्र, त्याने मैत्रिणीला खरेदी करून दिलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. कॉल सेंटर प्रकरणाचा तपास करताना हवाला आॅपरेटर्सची पोलिसांनी चौकशी केली. त्या वेळी पोलिसांना चक्रावून टाकणारी इंटरनेटच्या माध्यमातून बिटकॉइन चलनाद्वारे केल्या जाणाऱ्या खरेदी व्यवहारांची बाब उघड झाली. हे खरेदी व्यवहार उघड करण्यात पोलिसांना यश आले, तर त्याकरिता आणलेला पैसा कुठून प्राप्त झाला, याचा हिशेब या घोटाळ्यातील सूत्रधारांना द्यावा लागेल व त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक मजबूत होईल, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.