‘खरेदी केंद्रांवरील उर्वरित दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 04:02 AM2017-05-04T04:02:37+5:302017-05-04T04:02:37+5:30
राज्यातील खरेदी केंद्रांवरील खरेदीविना शिल्लक राहिलेली साधारणत: १० लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय
औरंगाबाद : राज्यातील खरेदी केंद्रांवरील खरेदीविना शिल्लक राहिलेली साधारणत: १० लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे निवेदन सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बुधवारी सुनावणीच्या वेळी न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठात केले.
देशात एकंदरीत किती तुरीची आवश्यकता आहे? त्यापैकी किती उत्पादन झाले आहे? तूट भरून काढण्यासाठी शासन तूर आयात करणार आहे काय? आयात करण्याऐवजी शासन शेतकऱ्यांकडील उर्वरित तूर खरेदी का करीत नाही, अशी विचारणा खंडपीठाने केंद्र आणि राज्य शासनाला केली. याचिकेवर गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे.
शेतकऱ्यांकडून सर्व तूर खरेदी करावी, अशा आशयाची विनंती करणारी जनहित याचिका ‘अन्नदाता शेतकरी संघटने’चे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत दाखल केली आहे. सुनावणीच्या वेळी शासनातर्फे वरीलप्रमाणे निवेदन करण्यात आले. गिरासे यांनी खंडपीठास सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचा भाव ४१५० रुपये क्विंटल आहे. त्यावर तुर खरेदीचा निर्णय घेण्याची शासनाची जबाबदारी आहे़ जादा तूर असेल तर विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त आहार म्हणून वाटप का करत नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली. (प्रतिनिधी)